Coronavirus : देशभरातील संसर्ग थांबेना; २४ तासांत ७०० नवे रुग्ण

Corona-in-India
Corona-in-India

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची अधिकृत आकडा आज सायंकाळपर्यंत  ४०६७ वर पोहोचला असून यातील ३६६६ जणांना कोरोना संक्रमण झाल्याची पुष्टी मिळाली आहे. देशभरात कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या ११८ वर गेली आहे. त्याच वेळी बरे झालेल्यांची संख्या २९१ आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये सुमारे ७०० नवे रुग्ण आढळले आहेत आणि ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सध्या पुकारण्यात आलेल्या १४ एप्रिलपर्यंतच्या लॉकडाउनचा कालावधी वाढवावा किंवा संपुष्टात आणावा, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ व १३ तारखेला उच्च पातळीवरील बैठक घेणार आहेत. या आढावा बैठकीत कोरोनाचा देशभरातील ‘हॉटस्पॉट’ वगळता इतर भागांमध्ये ‘लॉकडाउन’ कमी करण्यबाबत विचार करण्यात येणार आहे. त्यानंतर मोदी स्वतः याबाबतची घोषणा १२ किंवा १३ मार्चला करतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली.

कोरोना रुग्ण झपाट्याने वाढण्याचा हा कल पुढचे तीन ते चार दिवस कायम राहू शकतो असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. यादरम्यान देशभरातील तापमानातही वाढ होत आहे आणि तापमान वाढत जाईल तशी परिस्थितीत सुधारणा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या संसर्गाशी लढण्यासाठी देशात लागू केलेल्या लॉकडाउनचा १६ वा  दिवस उजाडला तरी कोरोना ग्रस्तांच्या वाढत्या आकड्याचा कल कमी होताना दिसत नाही. यातही सर्वाधिक प्रसार महाराष्ट्रात झाला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक आहे. 

कोरोनाने महाराष्ट्रा पाठोपाठ गुजरात, तेलंगण, मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यांमध्ये हाहाकार उडवला आहे.

दोन कोरोनाबाधितांचा आंध्र प्रदेशात मृत्यू
अमरावती - आंध्र प्रदेशमध्ये कोरोना संसर्गामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आंध्र प्रदेशातील मृतांची संख्या तीनवर पोचली आहे. गेल्या चोवीस तासात चौदा जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून एकूण बाधितांची संख्या २६६ वर पोचली आहे. या चौदापैकी पाच जण विशाखापट्टणचे, तीन जण अनंतपूर येथील, कर्नुल येथील तिघे, गुंटूर येथील दोघा आणि पश्‍चिम गोदावरी येथील एकाचा समावेश आहे. राज्यात आतापार्यंत कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या पाच जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. राज्यात अजूनही २५८ जणांवर उपचार सुरू आहेत.

कर्नाटकात १२ नवे रुग्ण आढळले
बंगळूर -
 कर्नाटक राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे १२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या १६३ वर पोचली आहे. तसेच आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून १८ जणांना घरी सोडले आहे. कर्नाटकात नव्याने आढळून आलेल्या बारा पैकी तिघे दिल्लीहून आले होते. यादरम्यान कर्नाटकात आयसीएमआरच्या मदतीने दहा प्रयोगशाळा सुरू केल्याचे राज्य आरोग्य विभागाने सांगितले आहे. 

पीककर्ज तीन महिने स्थगित करा
डेहराडून -
 राज्यातील सहकारी बँकांनी पिक आणि शेती कर्जापोटीचे हप्ते तीन महिन्यांसाठी स्थगित करावेत, असे आवाहन उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केले आहे. राज्यातील सुमारे ३ लाख ५० शेतकऱ्यांवर सहकारी बँकांचे विविध प्रकारचे कर्ज आहेत. आरबीआयने गेल्या आठवड्यात कर्जाचे हप्ते तीन महिने स्थगित ठेवण्याबाबत विनंती केली होती. या आवाहनाला अनेक बँकांनी प्रतिसाद दिला आहे. याशिवाय सहकारी बँकांनी देखील कर्जाबाबत लवचिकता आणावी, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. 

अफवा पसरवणाऱ्या चौघांना अटक
केंझार (ओडिशा) -
 येथील चार जणांना सोशल नेटवर्किंग साईट्सवरून कोरोना विषाणूंसंदर्भात चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आली. या चौघांनी वृत्तवाहीनीवर प्रसारित झालेल्या एका वृत्ताचा स्क्रीनशॉट काढला आणि त्याच्याशी छेडछाड करून केंझार जिल्ह्यात एक कोरोनाचा रुग्ण आढळल्याचे खोटे वृत्त सोशल नेटवर्किंग साईट्सवरून प्रसारित केल्याचे पोलिसांनी सांगितले.

राज्यांशी चर्चा आवश्‍यक
रायपूर -
 लॉकडाउन उठविल्यानंतर आंतरराज्य वाहतूक सुरू करण्यापूर्वी राज्यांशी सर्वंकष आणि व्यापक चर्चा आवश्‍यक असून त्यानंतरच धोरण ठरविता येऊ शकेल, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात मोदींना एक पत्र पाठविले असून त्यात लॉकडाउन उठविल्यानंतर होऊ शकणाऱ्या गर्दीबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

रेल्वेच्या २५०० डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष 
नवी दिल्ली -
 कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आवश्‍यक अशा विलगीकरण कक्षांची वाढती गरज लक्षात घेऊन रेल्वेने अडीच हजार डब्यांचे विलगीकरण कक्षात रूपांतर पूर्ण केले. यामुळे सुमारे चार हजार खाटांची भर पडलेली आहे. या कामासाठी पाच हजार डब्यांत विलगीकरण कक्ष करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. रेल्वे डब्यांच्या या रूपांतराचे प्रारूप रेल्वे तंत्रज्ञांनीच तयार केले होते. त्यास मान्यता मिळाल्यानंतर एका दिवसात जवळपास ३७५ डब्यांचे रूपांतर केले जात आहे. 

आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेणार
हैदराबाद -
 कोरोना व्हायरसबाधित रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत तेलंगण सरकार विशेष लक्ष ठेऊन आहे. यासंदर्भात काल मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरिय बैठक घेण्यात आली. या बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाय करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतही देणगी देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

अमेरिकेत चार भारतीय कोरोनामुळे दगावले
न्यूयॉर्क -
 अमेरिकेतील चार भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यातील एक ज्येष्ठ महिला अलीयम्मा कुरीयाकोस (वय ६५) या न्यूयॉर्कच्या रहिवासी होत्या. फेडरेशन ऑफ केरला असोसिएशन्स इन नॉर्थ अमेरिका या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार इतर मृतांची नावे थंकचान एन्चेनात्तू (५१), अब्राहम सॅम्युएल (४५) आणि शॉन अब्राहम (२१) अशी आहेत. न्यूयॉर्कमधील भारतीय वकीलातीचे अधिकारी मृतांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com