Coronavirus : कोरोनामुळं रस्त्यावर थुंकायला बंदी; या राज्यानं घेतला मोठा निर्णय

India-Corona-Condition
India-Corona-Condition

देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ज्या वेगानं रुग्ण वाढत आहेत. त्याचा दखल राज्य सरकारांकडून घेतली जात असून, काही धाडसी निर्णय घेण्यात येत आहेत. ओडिशा सरकारनं 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवलाय. तर बिहारमध्ये आमदारांच्या वेतनात कपात करण्यात आलीय. कोणत्या राज्यात काय निर्णय घेण्यात आलाय ते पाहुयात..

ओडिशा - लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत
भुवनेश्‍वर -
ओडिशात कोरोनाव्हायरसच्या बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने लॉकडाउनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनचा कालावधी वाढविलेले ओडिशा हे देशातील पहिले राज्य आहे.

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा निर्णय गुरुवारी जाहीर केला. देशपातळीवरील लॉकडाउनची मुदत १४ एप्रिलपर्यंत असली तरी ओडिशामध्ये त्यापुढे १६ दिवस लॉकडाउन असेल. त्याचप्रमाणे राज्यातील शैक्षणिक संस्थाही १७ जूनपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. केंद्र सरकारनेही अशीच पावले उचलावीत आणि एप्रिलअखेरपर्यंत विमान, रेल्वे वाहतूक सुरू करू नये, अशी विनंतीही ओडिशा सरकारने केली आहे.  राज्यात आज दोन नवे बाधित रुग्ण आढळल्याने एकूण संख्या ४४ झाली आहे. घराबाहेर पडणाऱ्यांनी मास्क घालणेही बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २५ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचे लॉकडाउन जाहीर केले होते. मात्र हा कालावधी वाढण्यावर मंत्रिमंडळाच्या उच्चस्तरिय बैठकीत निर्णय झालेला नाही.

राज्यातील निर्णय...

  • शाळा व महाविद्यालये १७ जूनपर्यंत बंद
  • कृषी, पशुपालन आणि ‘मनरेगा’ उपक्रम सोशल डिस्टसिंग पाळून सुरू
  • अत्यावश्‍यक सेवांसाठी मालवाहतूक सुरू
  • ओडिशात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांची काळजी सरकार घेणार

जम्मू-काश्‍मीर - ‘तुम्ही ३३ दिवस घरी का थांबू शकत नाही?’
श्रीनगर -
‘माझे पती शबीर शाह गेली ३३ वर्षे तुरुंगात काढत असतील तर लोक ३३ दिवस घराच्या आत का थांबू शकत नाहीत,’’ असा सवाल करीत हुर्रियत नेत्याची पत्नी डॉ. बिल्कीस यांनी कोरोनाव्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनचा मुद्दा ठसविला. डॉ. बिल्कीस या रेनवारीमधील ‘जेएलएनएम’ रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे लोकांनी पालन करावे. घरात थांबून आपल्या स्वतःच्या, कुटुंबीयांच्या जिवाची तसेच समाजाचीही काळजी घ्यावी. जम्मू-काश्‍मीरमध्ये प्रसार वाढत आहे. या प्राणघातक रोगाचा पुढचा बळी कोण ठरेल हे आपल्याला माहीत नाही. कुणाला रोजगार आहे की नाही, कुणी तरुण आहे की वृद्ध, डॉक्‍टर की इंजिनिअर असा कसलाही भेद न करता कोरोनाचे विषाणू आक्रमण करतात. त्यामुळे गर्दी करण्यापासून दूर राहणे आणि त्यासाठी घरात थांबणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असा सल्ला त्यांनी दिला.

बिहार - मंत्री, आमदारांच्या वेतनात १५ टक्के कपात
पाटणा -
 कोरोनाव्हायरसविरुद्धच्या लढ्यात बिहार सरकार वेगवेगळे उपाय योजत आहे. केंद्राप्रमाणेच राज्यातही सर्व मंत्री, विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांच्या मूळ वेतनात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे. बिहारमध्ये २४३ आमदार आणि विधान परिषदेचे ७५ सदस्य आहेत. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक काल  प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. त्यात झालेल्या या निर्णयाची अंमलबजावणी चालू महिन्यापासूनच होणार आहे. राज्य सरकारमधील मंत्री आणि आमदारांचे मूळ वेतन ४० हजार रुपये आहे. या मूळ वेतनाच्या रकमेतून १५ टक्के म्हणजे प्रत्येकाच्या वेतनातून सहा हजार रुपयांची कपात पुढील एका वर्षापर्यंत होणार आहे.

तेलंगण - सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी
हैदराबाद -
 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तेलंगण सरकारने सार्वजनिक ठिकाणी आणि संस्थांच्या परिसरात थुंकण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. थुंकण्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा मोठा धोका असल्याचे सरकारने म्हटले आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य आणि वैद्यकीय विभागाचे विशेष मुख्य सचिव शांती कुमारी यांनी यासंदर्भातील आदेश काल जाहीर केला. नागरी आरोग्य आणि सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी आणि संस्थांमध्ये पान- तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्यावर तातडीने बंदी घालण्यात आली आहे. असे केल्यास कडक कारवाईबरोबरच अटकही होऊ शकते, असे परिपत्रकात म्हटले आहे.

पंजाब - शैक्षणिक शुल्क मागणाऱ्या शाळांना नोटिसा
चंडीगड -
 लॉकडाउनच्या काळात पालकांना शैक्षणिक शुल्काची मागणी करणाऱ्या पंजाबमधील आणखी पंधराहून अधिक शाळांना पंजाबच्या शालेय शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासंदर्भातील माहिती आज शिक्षण मंत्री विजय इंद्र सिंघला यांनी येथे दिली. ते म्हणाले, की राज्यातील आतापर्यंत ३८ शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीवर उत्तर देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी संबंधित शाळेला देण्यात आला आहे. सिंघला म्हणाले की, लॉकडाउनच्या काळात शाळांनी वाहतूक शुल्क आणि नवीन शैक्षणिक वर्षाचे शुल्क आकारु नये, असे सांगण्यात आले आहे. तरी या शाळांनी लॉकडाउनच्या नियमांचा भंग केला आहे. 

केरळ - कोरोना रुग्णांसाठी निर्जंतुक चाचणी केंद्र
तिरुअनंतपुरम -
 श्रीचित्र इन्स्टिट्यूटने कोरोना रुग्णांसाठी खास निर्जंतुक चाचणी कक्ष तयार केले आहे. रुग्णांचा एकमेकांशी आणि इतरांशी संबंध येऊ नये हा यामागील उद्देश आहे. त्यासाठी दूरध्वनी केंद्राच्या धर्तीवर हा चाचणी कक्ष तयार केला आहे. या कक्षाचे सर्व दरवाजे बंद होतात. त्यात दिवा, टेबल, पंखा, कपाट आहेत. याशिवाय अतिनील किरणांचा दिवाही आहे. रुग्ण कक्षामधून बाहेर पडल्यानंतर हा दिवा २५४ नॅनो मीटर व १५ वॉट क्षमतेच्या अतिनील किरणांच्या उत्सर्जनाने कक्षाचे निर्जंतुकीकरण करेल. तीन मिनिटांत ही प्रक्रिया पार पडेल. कक्षात हातमोजांची एक जोडी, स्टेथोस्कोप असेल. या संस्थेने डॉक्‍टर आणि परिचारिका यांच्यासाठी वैयक्तिक सुरक्षा उपकरणे विकसित केली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे महत्त्वाचे उपकरण तयार करण्यात आले.

छत्तीसगड - हजारो कामगारांना सरकारचा निवारा
रायपूर -
 कोरोनाच्या उद्रकामुळे छत्तीसगडमध्ये लॉकडाउन असून राज्यातील आणि परराज्यातून आलेल्या सुमारे ८४ हजार कामगारांना आश्रय दिल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. त्यांना कामगारांना  आगाऊ वेतन, आहाराची व्यवस्था, निवासाची सोय आणि वैद्यकीय उपचारही उपलब्ध करुन दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काटघोरा येथे ५२ वषीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे छत्तीसगड राज्यातील बाधितांची संख्या ११ वर पोचली आहे. छत्तीसगड राज्यात अकरा जणांना लागण झाली असून त्यापैकी नऊ जणांना घरी सोडण्यात आले आहे. काटघोरा येथे बाधित रुग्ण सापडण्याची ही दुसरी वेळ आहे. हा व्यक्ती १६ वर्षाच्या बाधित मुलाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याचा चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला. तसेच मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी डोनेशन ऑन व्हिल्स नाचे अभियान सुरू केले असून या माध्यमातून गरजू लोकांना धान्य वाटप केले जाणार आहे. याशिवाय राज्यातील निर्वासित कामगारांसाठी  विविध जिल्ह्यात ३६७ निवारागृहांची निर्मिती करण्यात आली असून ते ७ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. या निवारागृहात दररोज भोजनाची व्यवस्था देखली असून आतापर्यंत ९३.५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या व्यतिरिक्तू छत्तीसगडमधील ३४, ९३४ कामगार तर राज्याबाहेर १०,९९४ कामगारांना विविध औद्योगिक वसाहतीत राहण्याची सोय करुन दिली आहे. याशिवाय चोवीस तास हल्पलाईन कार्यान्वित केले आहे.

भोपाळमध्ये ९३ वर बाधीत
भोपाळ -
 भोपाळमधील कोरोनाबाधितांची संख्या ९३ वर पोचली असून त्यात ५० आरोग्य कर्मचारी आणि १२ पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दिल्लीत तबलिगी जमताच्या कार्यक्रमास हजर असलेल्या २० जणांचा यात समावेश आहे. भोपाळमधील ९३ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय १२ जणांना क्वारंटाइन केले आहे. 

आंध्रात नवीन रुग्ण नाही
अमरावती -
 गेल्या चोवीस तासात आंध्र प्रदेशात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. राज्याचे नोडल ऑफिसर अर्जा श्रीकांत यांनी सांगितले. कालपासून एकही पॉझिटिव्ह अहवाल आला नसल्याचे सांगण्यात आले. काल सायंकाळी सहापासून ते आज सकाळी नऊ वाजेपर्यंत राज्यात २१७ जणांचे नमुने तपासण्यात आले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

गुजरातमध्ये ५५ नवीन रुग्ण
गांधीनगर -
 गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासांत नवीन ५५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील बाधितांची संख्या २४१ वर पोचली आहे. ५५ रुग्णापैकी ५० रुग्ण अहमदाबाद, सूरत येथील २, आणि दाहोद, आणंद आणि छोटा उदयपूर येथे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यापासून वंचित ६० लाख कुटुंबांना मोफत धान्य दिले जाईल.

मोहालीत सहा रुग्ण आढळले
मोहाली -
 पंजाबच्या मोहाली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सहा नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३६ वर पोचली आहे. सहा जणांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत १०१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी चार जणांना घरी सोडले आहे. तसेच ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com