लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी महिलाच पुढे सरसावल्या

Corona-In-India
Corona-In-India

जम्मू - काटेकोर लॉकडाउसाठी महिलांनीच कंबर कसली
चट्टा पिंड (जम्मू) -
लॉकडाउनचे काटेकोर पालन व्हावे आणि गावकरी सुरक्षित राहावेत म्हणून जम्मूजवळील चट्टा पिंड खेड्यातील महिलांनी आपल्या मुलींसह कंबर कसली आहे. गावाच्या वेशीसह वेगवेगळ्या चौकांत पोलिसांच्या मदतीला त्या काठ्या घेऊन उभ्या राहतात.

बुधवारी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ६१ वर्षीय वृद्धेच्या मृत्युमुळे जम्मूमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यानंतर नव्या रुग्णांची संख्या वाढते आहे. अशावेळी माजी सरपंच गुरमीत कौर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी नऊ ते सायंकाळी चार या कालावधीत महिलांचे पथक पोलिसांना साथ देत आहे. चौकांमध्ये काटेरी तारांचे कुंपण टाकण्यात आले आहे. या गावाची लोकसंख्या साडे सहा हजार पेक्षा जास्त आहे.  ५५ वर्षीय गुरमीत कौर यांनी सांगितले की, कोरोना हा प्राणघातक रोग आहे. पोलिस दल आणि सरकारला साथ देणे आपले कर्तव्य आहे. लॉकडाउनचे पालन व्हावे म्हणून फक्त पोलिस पुरेसे पडू शकत नाहीत. बाहेरील कुणी गावात येऊ नये म्हणून आम्ही ही भूमिका पार पाडतो आहोत. आम्हाला आमचे गाव सुरक्षित ठेवायचे आहे. दरम्यान, राज्यातील हॉटस्पॉटची संख्याही वाढते आहे. उधमपूर, राजौरी, सांबा आणि जम्मू असे भाग यात आहेत.

ओडिशा - बाधितांची संख्या ५० वर
स्मृती सागरिका कानुनगो
भुवनेश्‍वर -
 ओडिशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या शनिवारी दोनने वाढली. राज्यात बाधितांची एकूण संख्या ५० झाली आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने देण्यात आली.

‘आरएमआरसी’, ‘एम्स’ आणि कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालयात आज कोरोनाचे २९८ नमुने तपासण्यात आले. राज्यात बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून रुग्ण बरेही होत आहेत. आत्तापर्यंत दहा जण बरे झाले आहे, असे ट्विट आरोग्य विभागाने केले आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे भुवनेश्‍वरमधील असल्याने शहरातील अनेक भाग सील केले असून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी तेथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. 

विषाणूच्या प्रतिबंधासाठी

  • दररोज अकराशे नमुने तपासण्याची क्षमता
  • नमुने गोळा करण्यासाठी राज्यातील पाच शाळांमध्ये सोय
  • विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके घरी मोफत पुरविण्याचा सरकारचा विचार

अरुणाचल प्रदेश - जीवनावश्यक वस्तू पोचवताहेत ॲप्स
इटानगर -
लॉकडाउनच्या काळात घरात अडकलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारने विविध पावले उचलली आहेत. सरकारने यासाठी काही काही ॲप्सचा आधार घेतला आहे. या ॲप्सच्या माध्यमातून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू त्यांच्या घरापर्यंत पोहोचवल्या जात आहेत.

‘यू टेल अस’ आणि ‘दुकान दादा’ ही दोन ॲप्स लॉकडाउन लागू झाल्यानंतर सरकारने सुरू केली. ही ॲप्स २५ मार्चपासून सुरू आहेत. याचबरोबर ‘मी बडी’ आणि ‘एपिट्स’ ही दोन ॲप्स किराणा माल आणि मास्क, सॅनिटायझर यासारखा जीवनावश्यक वस्तूंसाठी सुरू करण्यात आली. खासगी कंपन्यांनी ही ॲप्स विकसित केली असून, सरकारला यामुळे मोठे सहकार्य होत आहे. राज्यातील नागरिक आता ॲप्सवर जीवनावश्यक वस्तूंची मागणी नोंदवत आहेत. त्यानुसार त्यांना पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी असून, सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांना घरबसल्या वस्तू मिळत असल्याने त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे आहे. अनेक दुकानांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी ऑनलाइन पेमेंटच्या विविध पर्यायांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com