जगभरात कोरोनाची दहशत, आतापर्यंत एवढ्या जणांचा मृत्यू; तर...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

  • कोरोना'चा धोका चीनसह जगभरात विषाणूची दहशत
  • मृतांची संख्या 490; संसर्गबाधित 24 हजार रुग्ण

बीजिंग : चीनमधील कोराना व्हायरसच्या उद्रेकात मरण पावलेल्यांची संख्या मंगळवारी (ता. 4) 490 वर पोचली असून 24 हजार 342 लोकांना या आजार झाला असल्याची माहिती चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आज दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूची लागण झाल्याने आत्तापर्यंत 490 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमधील 31 प्रांतनिहाय भागांमधील 24 हजार 324 जणांना या विषाणूची लागण झाल्याचे कालपर्यंत निष्पन्न झाले असल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले. मंगळवारी ज्या 65 रुग्णांचा मृत्यू झाला ते सर्व हुबेई प्रांत आणि त्याची राजधानी हुवानमधील आहेत. या विषाणूचा संसर्ग झालेले काल 3 हजार 887 नवे रुग्ण आढळले. रुग्णालयात दाखल असलेल्या 431 रुग्णांची प्रकृति गंभीर होती, तर 262 जणांना उपचारानंतर काल घरी सोडण्यात आले. "कोरोना'मुळे एकूण तीन हजार 219 रुग्ण गंभीर आजारी असून 23 हजार 260 लोकांना त्याची लागण झाल्याचा संशय आहे, अशी माहिती आयोगाने दिली. आत्तापर्यंत 892 रुग्णांची प्रकृति सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

जगभरात कोरोनाची दहशत, आतापर्यंत एवढ्या जणांचा मृत्यू; तर...

कोरोना व्हायरस हा आजार गेल्या काही वर्षांतील अत्यंत घातक समजला जात असून त्यातून बाहेर पडण्याचा उपाय सध्या तरी दिसत नसला तरी त्याचा फैलाव रोखण्यासाठी चीन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. "कोरोना'च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हुबेईमध्ये नवी रुग्णालये उभारली आहेत. एक हजार खाटांचे रुग्णालय सोमवारी (ता.3) सुरू झाले तर तेराशे खाटांचे रुग्णालय आज तयार झाले. ही दोन्ही रुग्णालयांतील कारभार चिनी सैन्यदलाच्या वैद्यकीय कर्मचारी पाहणार आहेत. चीनमधील 16 परकी लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्या हुआ चुनईंग यांनी दिली. मात्र ते कोणत्या देशाचे आहेत, हे त्यांनी उघड केले नाही.

भारत-चीन व्यापार संबंधांवर परिणाम नाही
चीनमधील भारतीय नागरिक आणि भारतीय दूतावासात काम करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी चीनचे परराष्ट्र मंत्रालय आणि स्थानिक प्रशासन अत्यंत जागरूक आहे. या आप्तकालीन स्थितीचा चीनच्या व्यापारावर तात्पुरता प्रभाव पडणार असून देशातील अंतर्गत लवचिकता वाढत असून मुबलक स्त्रोत आणि धोरणदृष्टीमुळे आर्थिक चढ-उतारावर मात करण्यात येईल. यामुळे भारत आणि चीनमधील व्यापार संबंध खंडित करण्याऐवजी ते अधिक दृढ व्हावेत, अशी आशा चीनचे भारतातील उच्चाधिकारी सून विडॉंग यांनी व्यक्त केली.

जगभरात लागण
- चीनमधील बीजिंगसह अन्य शहरांतही प्रादुर्भाव
- जगातील 20 देशांमध्येही फैलाव
- हॉंगकॉंग विशेष प्रशासकीय विभागात (एसएआर) 18 बाधित रुग्ण व एकाचा मृत्यू
- यापैकी 10 मकाऊ "एसएआर'मधील तर 11 तैवानमधील
- "कोरोना'मुळे फिलिपिन्समध्ये पहिल्या मृत रुग्णाची नोंद रविवारी (ता.2) झाली
- जगात 176 रुग्ण आढळले
- भारतात केरळमधील तीन जणांना लागण
- पाकिस्तानच्या चौघांना तर ऑस्ट्रिेलयाच्या दोघांना संसर्ग
- "कोरोना'च्या भीतीने जपानमध्ये "डायमंड प्रिन्सेस' या संपूर्ण जहाजाला अलग ठेवण्यात आले होते
- जहाजावरील कक्षातील 3 हजार 711 पैकी 10 जणांना या विषाणूची लागण
- बेल्जियमध्ये पहिला रुग्ण आढळला
- चीनमधील ब्रिटिश नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन
- चीनमध्ये कामाव्यतिरिक्त प्रवास न करण्याची फ्रान्समधील नागरिकांना सूचना
- जर्मनीत 12, फ्रान्समध्ये सहा, रशिया, इटली, ब्रिटनमध्ये प्रत्येकी दोन, फिनलंड, स्वीडन, स्पेनमध्ये प्रत्यकी एक रुग्ण
- आजाराच्या भीतीमुळे पर्यटकांनी इटलीकडे पाठ फिरवल्यास पर्यटनातून मिळणाऱ्या 4.99 अब्ज डॉलरच्या महसुलाला मुकावे लागण्याची भीती

कोरोना व्हायरसचा उद्रेक थांबविण्यासाठी चीनने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत. या संकटावर ते निश्‍चित मात करतील, अशी आशा आहे. या नव्या विषाणूशी लढण्यासाठी प्रभावी व तातडीने उपाय सापडावेत, अशीच आपल्या सर्वांची इच्छा आहे.- व्लादिमीर पुतीन, रशियाचे अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Outbreak 490 dead 24342 Cases Of Coronavirus Confirmed in China