Coronavirus : दक्षिणेतील राज्यात एका दिवसात वाढले 200 कोरोनाग्रस्त

India-Corona
India-Corona

नवी दिल्ली - भारतात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 हजार 500 वर पोहोचली आहे. भारतात, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून, त्यापाठोपाठ केरळमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईत आतापर्यंत 17 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. महाराष्ट्र, केरळमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त असली तरी, तमीळनाडूसारख्या राज्यात एका दिवसात 200 रुग्ण वाढल्यानं तेथे आणीबाणीची स्थिती निर्माण झालीय.

केरळ - सीमा बंद केल्या जाणार नाहीत
अजयकुमार

तिरुअनंतपुरम - राज्यातील जनतेला आवश्यक वस्तू व भाजीपाला वाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी कर्नाटक किंवा तामिळनाडूला जोडणाऱ्या कोणत्याही सीमा बंद करणार नाही असे केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी सांगितले.

तामिळनाडूमधील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्याची सीमा बंद करणार का असा सवाल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना केला असता ते म्हणाले, की राज्यात लागू केलेली टाळेबंदी नियमानुसार लागू राहणार असून राज्यातील नागरीकांनी अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडू नये अशा सूचना केलेल्या आहेत.

तसेच आवश्यक वस्तू व भाजीपाला वाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी राज्याच्या सीमा आम्ही खुल्या ठेवण्याचाच निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. दिप पेटवणार आहोत. मात्र, गरजूंना आर्थिक मदत देण्याकरिता निधीची राज्याला आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. दरम्यान केरळमध्ये शुक्रवारी ९ कोरोना विषाणूंची लागण झालेले रुग्ण आढळून आले असून यापैकी सात जण परदेशातून भारतात आलेले आहेत तर दोन दिल्ली येथील कार्यक्रमातून राज्यात परतलेले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात आतापर्यंत २९५ कोरोनाचे रुग्ण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

ओडिशा - भुवनेश्‍वरमध्ये ४८ तास संपूर्ण बंदी
स्मृती सागरिका कानुनगो

भुवनेश्‍वर - ओडिशात कोरोनाचा पाच रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकारने राजधानी भुवनेश्‍वर आणि भद्रक शहरात आज रात्रीपासून संपूर्ण बंदी जाहीर केली आहे. कटकमध्ये नवा रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातही संपूर्ण बंदी लागू केली आहे. 

मुख्य सचिव असित त्रिपाठी यांनी आज तातडीने पत्रकार परिषद बोलावून हा निर्णय जाहीर केला. भुवनेश्‍वरमध्ये कोरोनाचे पाच रुग्ण (८० टक्के) आणि भद्रकमध्ये एक रुग्ण (२० टक्के) आढळला आहे. राज्यात या साथीचा प्रसार रोखण्यासाठी ही दोन्ही शहरे संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.

बाधितांची संख्या ३१ मार्चपर्यंत एक आकडीपर्यंत रोखण्याचे उद्दिष्ट सरकारने गाठले आहे. याचाच पुढची योजना म्हणजे संपूर्ण बंदी आहे. ती रविवारी (ता. ५) रात्री आठपर्यंत लागू राहील. गेल्या महिनाभरात विदेशात न जाताही पाचव्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला, ही गंभीर घटना आहे, असे ते म्हणाले. 

देशभरातील टाळेबंदीत धान्य, भाजीपाला, फळे, दूध, मासे व चिकन विक्री सुरु असली तरी भुवनेश्‍वर आणि भद्रकशहरांमध्ये ही दुकाने आज रात्रीपासून पुढील ४८ तास बंद राहणार आहेत. 
- अभय, ओडिशाचे पोलिस महासंचालक

जम्मू-काश्मीर - किराणा मिळणार घरपोच
जावेद मात्जी

श्रीनगर - कोरोनाचा प्रादुर्भावाला कमी करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांच्या टाळेबंदीचा निर्णय घेतला असला तरी जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढतच आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी श्रीनगर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यांनी २३ किराणा दुकानांची नेमणूक केली आहे जी नागरिकांना त्यांच्या आवश्यकते नुसार किराणा घरपोच नेऊन देतील. 

जिल्हा दंडाधिकारी श्रीनगर डॉ. शाहिद इक्बाल चौधरी यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या व्यवस्थेअंतर्गत प्रशासनाने २३ किराणा दुकानांची नेमणूक केली असून ही दुकाने रहिवाशांकडून दूरध्वनीवरून सामानाची यादी घेतील आणि त्यांच्या ३ किलोमीटरच्या परिघातील घरांना किराणा सामान कमीतकमी शुल्कात पुरवतील असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तसेच या आदेशामध्ये पुढे असे म्हटले आहे की या दुकानामध्ये प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, जे सामानाची यादी घेतील आणि मग हे सामान लोकांना घरपोच देतील. या विषयी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. शाहिद म्हणाले, की रहिवाशांच्या सोयीसाठी आणि रोगाचा प्रसार आणि परिस्थितीचे सुलभ व्यवस्थापन या उद्देशाने मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करण्यासाठी ही व्यवस्था केली गेली आहे.

आंध्र प्रदेश - राज्यात पहिला बळी
आर. एच. विद्या

हैदराबाद - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे येथील विजयवाडा येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा ३० मार्चला मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने शुक्रवारी दिली. दरम्यान आंध्रप्रदेशातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. 

कोरोनाची लागण झाल्याच्या संशयावरून या व्यक्तीला ३० मार्च रोजी विजयवाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली असून रुग्णालयात दाखल केल्याच्या तासाभरातच त्याचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले. मृत व्यक्तीला आधीपासून हायपर-टेन्शन, मधुमेह आणि हृदयविकाराच्या समस्यांसह आरोग्यविषयक अनेक तक्रारी होत्या असे यावेळी रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत्यूनंतर व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान मृत व्यक्तीचा मुलगा १७ मार्चला दिल्लीवरून परतला असून त्याच्या मुलाच्या माध्यमातून त्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय रुग्णालयातील प्रशासनाने सांगितले. त्याच्या मुलाच्या रक्ताचे नमूनेही तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २९ जणांना एकांतवासात पाठवण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

तमिळनाडू - एका दिवसात १०२ रुग्ण
वॉल्टर स्कॉट

चेन्नई - भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून तामिळनाडूमध्ये एका दिवसात १०२ नविन रुग्णांची नोंद झाली असून आता तामिळनाडूतील रुग्णांचा आकडा ४११ वर पोहोचला आहे. यावेळी राज्य सरकारने राज्यात कोरोना अद्यापही दुसऱ्या स्टेज मध्ये असल्याचे सांगितले असून लोकांना सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गुरूवारी राज्यात ७५ कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली होती. मात्र शुक्रवारी हाच आकडा १०२ वर पोहोचला आहे. दरम्यान राज्य सरकारने मार्चच्या मध्यभागी दिल्लीत झालेल्या इस्लामिक परिषदेसाठी गेलेल्या सर्व १ हजार १०३ लोकांची चाचणी घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. तसेच राज्यातील ४११ रुग्णांपैकी इस्लामिक परिषदेसाठी गेलेले ३६४ जण हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले असल्याची माहिती राज्याचे आरोग्य सचिव बीला राजेश यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. तसेच यातील अनेक रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसून येत नव्हती मात्र कोरोनाच्या चाचणीनंतर त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचेही बीला राजेश यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच राज्य सरकारने आत्तापर्यंत ३ हजार ६८४ जणांची चाचणी घेतली असून यापैकी ४११ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com