भाजपसाठी देशच सर्वांत महत्त्वाचा: मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

भाजप व एनडीएसाठी देश हा पक्षापेक्षा मोठा आहे. मात्र कॉंग्रेस सत्तेमध्ये असताना हे चित्र नव्हते. त्यांच्यासाठी पक्ष हा देशापेक्षा मोठा होता

नवी दिल्ली - आता सत्तेत असलेला पक्ष काळे धन आणि भ्रष्टाचाराविरोधात लढत आहे; तर विरोधी पक्षांकडून यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात येत नसल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) केली.

भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी देश हाच सर्वांत महत्त्वाचा असल्याचे ठाम प्रतिपादनही पंतप्रधानांनी यावेळी केले. ""भाजप व एनडीएसाठी देश हा पक्षापेक्षा मोठा आहे. मात्र कॉंग्रेस सत्तेमध्ये असताना हे चित्र नव्हते. त्यांच्यासाठी पक्ष हा देशापेक्षा मोठा होता,'' असे मोदी म्हणाले.

"याआधी सत्ताधारी पक्षच बोफोर्स वा स्पेक्‍ट्रमसारख्या गैरव्यवहारांमध्ये अडकला होता. त्यावेळी याविरोधात लढण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले होते. मात्र आता सत्ताधारी पक्षाकडून काळ्या धनास पराभूत करण्यासाठी युद्ध केले जात आहे; आणि विरोधकांकडून यास विरोध केला जात आहे,'' असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयास देशातील बहुसंख्य राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संसदीय मंडळाच्या बैठकीस संबोधित करताना पंतप्रधानांनी यासंदर्भातील भूमिका विशद केली.

Web Title: country is above the party for BJP, says PM