देशप्रेम हृदयातूनच आले पाहिजे...

संतोष धायबर
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

सर्वोच्च न्यायालयाने देशप्रेमाबद्दल आदेश दिले असले तरी भारत माता की...म्हटल्यानंतर 'जय' शब्द ज्याच्या तोंडातून तत्काळ बाहेर पडतो, तो खरा देशप्रेमी. देशप्रेम कोणावर लादून होणार नाही तर ते हृदयातूनच आले पाहिजे....

'देशभरातील चित्रपटगृहांनी चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावलेच पाहिजे व नागरिकांनीही आदर म्हणून उभे राहिलेच पाहिजे. राष्ट्रगीत वाजवले जात असताना पडद्यावर राष्ट्रध्वज दाखविला पाहिजे,' असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 30) दिले. आपण एका देशात राहतो, याची लोकांना जाणीव होण्याची आता वेळ आली आहे. हा माझा देश आहे आणि ही माझी मातृभूमी आहे, असे नागरिकांना वाटले पाहिजे. राष्ट्रगीत व तिरंग्याविषयी आदर दाखविणे ही देशातील प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

देशप्रेम, राष्ट्रगीत व तिरंग्याविषयीच्या आदराबद्दल सर्वोच्च न्यायालयानेच आता आदेश दिले आहेत. खरंतर न्यायालयानेच आदेश देण्याची वेळ यायला पाहिजे का? आणि अशी वेळ येत असेल तर काहीतरी चुकते आहे का? हे तपासून पाहणे गरजेचे आहे. जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत हजारो चित्रपटगृहे आहेत. चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवले जात असताना नागिरकांनी त्याचा आदर राखला पाहिजेच. परंतु, प्रत्येकजण हे कितपत पाळेल? न पाळणाऱयांचे काय? यासाठी काही उपाययोजना आखल्या गेल्या आहेत का? या प्रश्नांची उत्तरेसुद्धा सुद्धा महत्त्वाची आहे.

न्यायालयाचा निर्णय ठीक आहे आणि त्याचे पालनही केले जाईल; मात्र राष्ट्रगीत वाजविले जात असताना लोकांनी उभे राहण्याची आवश्‍यकता आहे का? हा प्रश्‍न आहे. यामुळे देशभक्ती किंवा राष्ट्रीयत्व वाढण्यास मदत होईल का? असा प्रश्न एमआयएमप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला आहे. आता याला देशप्रेम म्हणायचे का?

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांपासून संरक्षण करणाऱया जवानांवरच दगडफेक होताना दिसते. काही दिवसांपूर्वी टोळक्याने एकट्या सापडलेल्या जवानाला बेदम मारहाण केली. संबंधित छायाचित्र सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले. छायाचित्र पाहून नेटिझन्स हळहळले. प्रतिक्रियाही नोंदविल्या. जवानाला बेदम मारहाण करणारे हेच युवक कधी ना कधी चित्रपटगृहात चित्रपट पहायला जातीलच. चित्रपटगृहात गेल्यानंतर राष्ट्रगीत लावल्यानंतर त्यांच्याकडून कितपत आदर होईल? नागरिकांचे संरक्षण करणाऱया जवानांच्या जीवावर उठणाऱयांकडून काय अपेक्षा ठेवाव्यात? राष्ट्रगीताला जरी उभे राहिले तरी ते त्यांचे राष्ट्रप्रेम समवाजे का? अशा प्रकारचे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात.

काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना वाचविण्यासाठी जवानच आले होते. दगडफेक करणाऱयांच्या नातेवाईकांचासुद्धा यामध्ये समावेश असू शकतो. जवानांनी जीवाची बाजी लावत भर पावसात अनेकांची सुटका केली होती. या जवानांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्याऐवजी ते दगडफेक करताना दिसतात, हेच का त्यांचे देशप्रेम? काश्मीरमधील विविध भागांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकविले जातात, हेच का त्यांचे देशप्रेम? पाकिस्तानने एखादा सामना जिंकल्यानंतर फटाके फोडले जातात, हेच का त्यांचे देशप्रेम? कोणत्याच गोष्टीमधून जर देशप्रेम दिसत नसेल तर चित्रपटगृहात फक्त त्यांचे देशप्रेम उफाळून येण्याची अपेक्षा ठेवायची का?

भारत-पाकिस्तान सीमेवर अनेक जवान धारातिर्थी पडत आहेत. ऐन तारुण्यात संसार फुलविण्याची स्वने पाहणारे जवान देशासाठी प्राणांची आहुती देत आहेत. कुटुंबांपासून शेकडो किलोमीटर अंतरावर राहून देशसेवा करताना दिसतात. थंडी, ऊन, पावसात ते अहोरात्र देशरक्षण करतात. हे देशप्रेम. वर्षभरात दहशतवादी हल्ल्यात 300 जवान हुतात्मा झाले आहेत, यामध्ये अधिकाऱयांचाही समावेश आहे. या जवानांच्या घरातील चिमुकल्यांच्या चेहऱयाकडे पहा, त्यांच्या कुटुंबियांकडे पहा, मग काय ते समजेल. धुळ्यातील जवान चंदू चव्हाण आजही पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. जवानांच्या बातम्या आल्या की आपण काहीवेळ हळहळतो अन् विसरून जातो. परंतु, या जवानांच्या कुटुंबियांना आयुष्यभर आठवणीवरच जगावे लागते.

देशातच राहून येथेच बॉम्बस्फोट घडविणारे निरपराधांचा जीव घेतात...भारतीय पासपोर्टचा वापर करून परदेशात पळ काढतात...सोयी सुविधा घ्यायच्या एका देशाच्या अन् उदोउदो करायचा तो मात्र दुसऱयांचा. देशप्रेमाबद्दल यांच्याकडून कितपत अपेक्षा ठेवायची. देशाबद्दल तुम्हाला एवढाच तिरस्कार असेल तर वाटा मोकळ्या आहेत. परंतु, निरपराधांचा जीव घेण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. देशावर कोणतेही संकट आले तर तुमचा जीव वाचविण्यास प्रथम येतात ते आमचे जवान. जवानांचे हात कायद्यामध्ये अडकले आहेत. एकदा का ते मोकळे झाले ना, तर काय अवस्था होईल याचा विचार दगडफेक करताना करा.

सर्वोच्च न्यायालयाने जरी देशप्रेमाबद्दल आदेश दिले असले तरी भारत माता की... म्हटल्यानंतर 'जय' शब्द ज्याच्या तोंडातून तत्काळ बाहेर पडतो, तो खरा देशप्रेमी. देशप्रेम कोणावर लादून होणार नाही तर ते हृदयातूनच असले पाहिजे....
जय हिंद!

Web Title: Country pride must be from heart