देश सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या जवानांसोबत : PM नरेंद्र मोदी

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 14 September 2020

संकटजन्य परिस्थितीत अधिवेशनाच्या पंरपरेत कोणतीही बाधा येणार नाही. संपूर्ण देश लष्करी जवानांच्या पाठिशी उभा आहे, असा संदेशही संसदेतून दिला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

देशावर कोरोना मोठे संकट (Coronavirus) ओढावले असताना परंपरेनुसार पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनाची खबरादी घेऊन हे अधिवेशन पार पडत आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संदेश दिला.

सध्याच्या घडीला सीमारेषेवर तणावपूर्ण वातावरण आहे. भारतीय जवान देशाच्या संरक्षणासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. संकटजन्य परिस्थितीत अधिवेशनाच्या पंरपरेत कोणतीही बाधा येणार नाही. संपूर्ण देश लष्करी जवानांच्या पाठिशी उभा आहे, असा संदेशही संसदेतून दिला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संबोधनामध्ये म्हणाले की, सध्याच्या घडीला देशाचे वीर जवान देशाच्या संरक्षणासाठी सीमारेषेवर उभे आहेत. काही कालावधीतर बर्फवृष्टीला सुरुवात होणार आहे. तरीही त्यांच्यामध्ये उत्साह आणि प्रेरणा दिसून येते. ते ज्या आत्मविश्वासाने संरक्षणासाठी सज्ज आहेत त्या आत्मविश्वासाला प्रोत्साहित करुन संसदेच्या माध्यमातून आपण सर्वांनी त्यांना प्रोत्साहन द्यायचे आहे. देश त्यांच्यासोबत उभा आहे, हा संदेश आपल्याला द्यायचा आहे. सर्व सदस्य एकमताने हा संदेश पोहचवतील, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

मोदी पुढे म्हणाले की, खूप मोठ्या कालावधीनंतर सर्वांची भेट होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसह विशेष वातावरणात अधिवेशन सुरु होत आहे. कोरोनाजन्य परिस्थिती असताना परंपरा खंडीत होऊ नये यासाठी कामकाज महत्त्वपूर्ण आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेपूर्वी थांबवण्यात आले होते. पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यावर चर्चा करायची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: country stands with our soldiers Prime Minister Narendra Modi Before monsoon session of parliament