क्षयरोगावरील औषध उपलब्ध करणार का?

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

लालराम स्वरूप (एलआरएस) क्षयरोग रुग्णालयात दाखल झालेल्या 18 वर्षांच्या महिला रुग्णावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शिफारशींनुसार औषधोपचार करण्यात येत आहेत का, याविषयी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश न्यायाधीश संजीव सचदेव यांनी दिला आहे

नवी दिल्ली - क्षयरोगावर उपयुक्त ठरणारे औषध बाजारात उपलब्ध नाही. मात्र, रुग्णांसाठी ते तुम्ही उपलब्ध करणार का, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व दिल्लीतील क्षयरोग रुग्णालयांना बुधवारी केला.

लालराम स्वरूप (एलआरएस) क्षयरोग रुग्णालयात दाखल झालेल्या 18 वर्षांच्या महिला रुग्णावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शिफारशींनुसार औषधोपचार करण्यात येत आहेत का, याविषयी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश न्यायाधीश संजीव सचदेव यांनी दिला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकेतील औषधनिर्माती कंपनीच्या "बेडक्विलाइन' या क्षयरोगावरील औषधांचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण मोहिमेत सुधारणा करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. या औषधाचा वापर करण्यापूर्वी त्याच्या परिणामकारकतेची चाचणी घेण्याचे कारण देत रुग्णालयाने मार्गदर्शन सूचनांचे पालन केले नसल्याची तक्रार क्षयरोग उपचार क्षेत्रातील तज्ज्ञांची केली असून, त्याला उत्तर देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

संबंधित मुलीचे वडील कौशल त्रिपाठी यांनी म्हटले आहे की, चाचणीशिवाय औषधाचा वापर करण्याचा धोका पत्करण्याची तयारी रुग्णालयाची नसेल तर ते स्वतः औषध उपलब्ध करून देतील आणि अन्य रुग्णालय किंवा डॉक्‍टरांची शिफारस त्यासाठी घेतील. यावर उत्तर देताना संबंधित रुग्णालयाने सांगितले की, औषध वापर करण्यासाठी नियमानुसार त्याची चाचणी करणे आवश्‍यक होते. मात्र, काही तातडीच्या प्रकरणात व रुग्ण धोका पत्करण्यास तयार असेल तर औषधाचा वापर करणे शक्‍य असते.

"बेडक्विलाइन' हे औषध सध्या बाजारात मिळत नाही. केवळ उत्पादकांकडूनच त्याचा थेट पुरवठा होतो. भारतातील फक्त सहा क्षयरोग केंद्रात ते उपलब्ध आहे. औषध सहजपणे सर्वत्र मिळण्याची मागणी आपण याचिकेद्वारे केली असल्याची माहिती त्रिपाठी यांनी दिली.

Web Title: Court asks Hospitals about TB