केजरीवाल यांची याचिका न्यायालयाने फेटाळली

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

जेटली यांच्या आर्थिक तपशिलाची मागणी

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांचे बॅंक खाते, कर परतावा तसेच अन्य आर्थिक नोंदी आदींचा तपशील द्यावा, यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. जेटली यांनीही केजरीवाल यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे.

केजरीवाल यांनी या याचिकेद्वारे जेटली व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची बॅंकेची कागदपत्रे व ज्या कंपनीत त्यांचा दहा टक्‍के हिस्सा आहे, त्यांचा तपशील देण्याची मागणी केली होती. या याचिकेत काही अर्थ नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जेटली यांनी दाखल केलेल्या पुराव्यातील काही भाग काढून टाकावा, अशी मागणीही केजरीवाल यांनी न्यायालयाकडे केली होती. यासंदर्भातील याचिकाही न्या. राजीव सहाय एंडलॉ यांनी फेटाळून लावली. या आदेशाला आव्हान देण्यात येईल, असे केजरीवाल यांचे वकील अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले.

अरुण जेटली हे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष असताना संघटनेतील अनिमितता व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी जेटली व त्यांच्या कुटुंबावर केला होता. जेटली यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच केजरीवाल, राघव चढ्ढा, कुमार विश्‍वास, आशुतोष, संजय सिह व दीपक वाजपेयी यांच्यावर दहा कोटींचा मानहानीचा दावा 2015 मध्ये दाखल केला आहे.

Web Title: The court rejected the plea of Kejriwal