corona updates: देशात आतापर्यंत जवळपास 55 लाख कोरोनाबाधित, रिकव्हरी रेट दिलासा देणारा

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 21 September 2020

सध्या देशभरात कोरोनाचे 10 लाख 3 हजार 299 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत 43 लाख 96 हजार 399 कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.

नवी दिल्ली: देशात सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या रुग्णवाढीने वेग पकडला असला तरी आता एक दिलासादायक बातमी आली आहे. मागील दोन दिवसांपासून देशात नवीन वाढलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात मागील 24 तासांत 94 हजार 612 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेटही 79.68 टक्क्यांवर पोहचला आहे. मागील आठवड्यात प्रतिदिन देशात जवळपास लाखाच्या आसपास कोरोना रुग्णांचं निदान होत होतं. पण आता रिकव्हरी रेट वाढल्याने परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. 

मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 86 हजार 961 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच काल एका दिवसात 1,130 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांतील रुग्णवाढीमुळे देशात आतापर्यंत कोरोना झालेल्या रुग्णांची सख्या 54 लाख 87 हजार 882  इतकी झाली आहे. सध्या देशभरात कोरोनाचे 10 लाख 3 हजार 299 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत 43 लाख 96 हजार 399 कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.

 Unlock 4: 188 दिवसानंतर ताजमहल पर्यटकांसाठी खुला; पाळावे लागणार सर्व नियम

 

देशात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून अनलॉक 4 सुरु झालं आहे. आता देशातील बरीच पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली होत आहेत. आजपासून हिमाचल प्रदेश सरकारने राज्यातील पर्यटन खुलं करण्याची परवानगी दिली आहे. तसेच ताजमहल आणि आग्रा किल्ला आजपासून पर्यटकांना खुला असेल. 

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; महाराष्ट्रातील खासदाराचा समावेश

महाराष्ट्रातील परिस्थिती देखील दिलासा देणारी असून मागील 24 तासांत राज्यात 26 हजार 408 कोरोना रुग्ण बरे झाले असून 20 हजार 598 नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. दुसरीकडे मुंबईतूनही चांगली बातमी आली आहे. मुंबईत मागील 24 तासांत नव्याने कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होती. काल मुंबईत एका दिवसात 2,226 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून  5 हजार 38 रुग्ण नीट होऊन घरी परतले आहेत. 

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 update india recovery patient is high than new cases