'मोबाईल रेडिएशन कमी करायचंय? गायीच्या शेणाची चीप वापरा'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

कथीरिया यांनी या चीपबद्दल माहिती देताना म्हटलं की, आपण काही दिवसांपूर्वी ऐकलं असेल की, अभिनेता अक्षय कुमार ने गायीचे शेण खाल्लं होतं. आपणदेखील खाऊ शकता.

सध्या गाय हा विषय देशात अधूनमधून सातत्याने चर्चेला येतो. गायीला हिंदू धर्मात असलेल्या महत्त्वामुळे गायीविषयीच्या चर्चेला सातत्याने तोंड फुटते. गायीच्या शेणाबद्दल खूप सारे दावे आजवर केले गेले आहेत. या दाव्यांमुळे बरेचदा वादही झाले आहेत. गायीला माता मानणाऱ्या लोकांचा एक मोठा समूह देशात आहे. त्यामुळे त्यांच्या भक्तीतून असे अवास्तव दावे केले जातात, असंही काहीचं म्हणणं आहे. मात्र, आता गायीच्या शेणाला धरून असंच एक वक्तव्य केलं गेलं आहे. गायीचं शेण हे अँटी-रेडिएशन आहे आणि हे सायंटीफिकली सिद्ध झालं आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय कामधेनु आयोगाकडून आलं आहे. 

हेही वाचा - Hathras: तुमची मुलगी असती तर असेच अंत्यसंस्कार केले असते का, हायकोर्टाचा पोलिसांना सवाल

सोमवारी 'कामधेनु दिपावली अभियाना'अंतर्गत राष्ट्रीय कामधेनु आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथीरिया यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी गायीच्या शेणापासून बनलेल्या एका चीपचे अनावरण देखील केलं आहे. या चीपचे अनावरण करताना त्यांनी असा दावा केलाय की, ही चीप मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनला मोठ्या प्रमाणात कमी करते.  कथीरिया यांनी  पुढे म्हटलं की, ही एक रेडिएशन चीप आहे. आपण या चीपला आपल्या मोबाईलमध्ये ठेऊ शकता. आम्ही हे निरिक्षण केलं आहे की, जर आपण या चीपला आपल्या मोबाईलमध्ये ठेवाल तर ही चीप आपल्या मोबाईलच्या रेडिएशनला मोठ्या प्रमाणावर कमी करते. जर आपल्याला आजारपणापासून वाचायचे असेल तर आपण याचा वापर करु शकता. या चीपला 'गौसत्व कवच' असे नाव दिले आहे. या गौसत्व कवच चीपची निर्मिती गुजरातच्या राजकोटमधील श्रीजी गौशालाद्वारे केली गेली आहे. 

कथीरिया यांनी या चीपबद्दल माहिती देताना म्हटलं की, आपण काही दिवसांपूर्वी ऐकलं असेल की, अभिनेता अक्षय कुमार ने गायीचे शेण खाल्लं होतं. आपणदेखील खाऊ शकता. हे एक औषध आहे. मात्र, आपण आपल्या विज्ञानाला विसरुन गेलो आहोत. त्यांनी म्हटलं की, आता आम्ही एक शोध योजना सुरु केली आहे. या विषयांवर आम्ही शोध करु इच्छीतो ज्यांना आपण एक मिथक मानतो.  गायीच्या शेणापासून बनलेल्या इतर उत्पादनांना दाखवत त्यांनी म्हटलं की गायीचे शेण एँटी रेडिएशन आहे. हे सर्वांचे रक्षण करते. जर आपण याला आपल्या घरी न्याल तर आपले घर रेडिएशन फ्रि होऊन जाईल. आणि हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे. 

हेही वाचा - न्यूज चॅनेल विरोधात बॉलिवूड गेले कोर्टात; बदनामी केल्याचा आरोप

कथीरिया यांनी सांगितलं की, 500 हून अधिक गौशाला याप्रकारच्या एँटी-रेडिएशन चीपची निर्मिती  करत  आहेत. या चीपची किंमत 50 ते 100 रुपये इतकी आहे. एक व्यक्ती तर या चीप्सना अमेरिकेमध्ये निर्यात करत आहे, जिथे याला 10 डॉलर प्रती चीप या दराने विकलं जात आहे.
 
राष्ट्रीय कामधेनु आयोग हा मत्स्य, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाअंतर्गत येतो. केंद्राद्वारा 6 फेब्रुवारी 2019 रोजी या आयोगाची स्थापना केली गेली होती. या आयोगाचा उद्देश गायींचं संरक्षण आणि त्यांचा विकास  हे आहे. केंद्राच्या 2019-20 सालच्या बजेटमध्ये याची घोषणा केली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cow dung anti-radiation chip mobile phones to reduce radiation safeguard Rashtriya Kamdhenu Aayog Chairman Vallabhbhai Kathiria