
हरदीप डंग यांनी सर्वप्रथम गाय आश्रयस्थान उघडण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्याची सरकारनं अंमलबजावणी केलीये.
Hardeep Dang : 'गाय पाळणाऱ्यांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार असावा'; भाजप मंत्र्याचं मोठं विधान
रतलाम : केवळ गोपालकांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार असावा, असं स्पष्ट मत मध्य प्रदेशचे ऊर्जा मंत्री हरदीप सिंह डंग (Hardeep Singh Dang) यांनी व्यक्त केलं. ते पत्रकारांच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान डंग यांनी मंचावरून गायीच्या सेवेबाबत अनेक मागण्या सरकारसमोर ठेवल्या. यासंदर्भात मी विधानसभेत तीन-चार प्रस्तावही ठेवल्याचं डंग यांनी सांगितलं.
हरदीप सिंह डंग हे कालुखेडाजवळील माँ अन्नपूर्णा माता मंदिर, सेमालिया इथं आयोजित इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टच्या 73 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांचं गायीवरील प्रेम स्पष्टपणे दिसून आलं.
मंचावरून ते म्हणाले, केवळ गोपालकांनाच निवडणूक लढवण्याचा अधिकार असावा. हरदीप डंग यांनी सर्वप्रथम गाय आश्रयस्थान उघडण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्याची सरकारनं अंमलबजावणी केलीये. नुकतीच सरकारनं 3000 गोशाळा उघडण्याची तयारी सुरू केली आहे.
ज्या सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांचा पगार 25 हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांना दरमहा 500 रुपये गायींच्या सेवेसाठी जमा करणं बंधनकारक करण्यात यावं. शिवाय, गाय पाळणाऱ्या शेतकऱ्याला शेतजमीन खरेदी-विक्रीची परवानगी द्यावी, असंही मंत्री म्हणाले.

'गाई पाळणाऱ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार असावा'
मंत्री डंग म्हणाले, 'माझ्यासारखा नेता.. मग तो आमदार असो, खासदार असो किंवा पंच-सरपंच असो, जो कोणी माता गाय पाळतो त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. मी स्वत: गाय पालनाच्या मार्गावर आहे. भोपाळमध्ये माझ्या बंगल्यावर एक गाय आहे आणि मी तिथं गायीची सेवा करतो.'