धोकादायक संघटनांमध्ये भाकप (माओवादी) चौथी

वृत्तसंस्था
रविवार, 23 सप्टेंबर 2018

नक्षलवाद्यांशी संबंध असल्यावरून देशात झालेल्या धरपकडीनंतर वाद सुरू असतानाच भारतातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) ही जगातील चौथ्या क्रमांकाची धोकादायक दहशतवादी संघटना असल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : नक्षलवाद्यांशी संबंध असल्यावरून देशात झालेल्या धरपकडीनंतर वाद सुरू असतानाच भारतातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) ही जगातील चौथ्या क्रमांकाची धोकादायक दहशतवादी संघटना असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. 

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. इसिस, तालिबान आणि अल शबाब या दहशतवादी संघटनांनंतर भाकप (माओवादी) ही संघटना धोकादायक असल्याचे अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, जगात इराक आणि अफगाणिस्ताननंतर दहशतवादाचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे.

भारतामध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 53 टक्के हल्ले माकप (माओवादी) संघटनेने केले आहेत. 2015 पर्यंत दहशतवादाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, 2017 मध्ये जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये 24 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. तसेच, देशभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही 88 टक्के वाढ झाली आहे. 2017 मध्ये भारतात एकूण 860 दहशतवादी हल्ले झाले. यापैकी 25 टक्के हल्ले केवळ जम्मू-काश्‍मीरमध्ये झाले. माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांचे यातील प्रमाण 53 टक्के आहे.

माओवाद्यांनी 2016 मध्ये 338 हल्ले केले होते. ही संख्या 2017 मध्ये घटून 295 झाली असली तरी या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येत 16 टक्के, तर जखमी होणाऱ्यांच्या संख्येत 50 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

Web Title: CPI (Maoist) fourth in dangerous organizations