
Crime : हद्दच झाली! हेल्मेट घातलं नाही म्हणून पोलिसांनी तरुणावर झाडली गोळी; तरुणाला...
पाटणा : बिहार पोलिसांचं गैरकृत्य पुन्हा एकदा समोर आलं आहे. जहानाबाद जिल्ह्यात ओकरी पोलिस ठाण्याच्या स्टेशन प्रमुखावर वाहन तपासणीच्या नावाखाली तरुणावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. हा आरोप गंभीर जखमी झालेल्या सुधीरच्या वडिलांनी पोलीस स्टेशन प्रमुखावर केला आहे.
सध्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घोसी परिमंडळ निरीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोककुमार पांडे यांना घटनास्थळी जाऊन तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले की, 'ओकरी पोलिस स्टेशनचे प्रमुख चंद्रहास कुमार अनंतपूर गावाजवळ तपासणी करत होते. दरम्यान, माझा मुलगा सुधीर कुमार तेथून जात होता. त्याच्याकडे हेल्मेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. त्यामुळे पोलिसांना पाहून तो पळू लागला. त्याला पळताना पाहून पोलिसांनी काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला, त्यानंतर त्याला गोळ्या घातल्या. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.'
जखमी तरुणावर नालंदा जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुण सुधीर कुमारची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांनी अथक प्रयत्नानंतर गोळी शरीरातून काढली आहे.
या प्रकरणी जहानाबादचे एसपी दीपक रंजन यांनी सांगितले की, आम्हाला याबाबत माहिती मिळताच, आम्ही तात्काळ घोसी परिमंडळ निरीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अशोककुमार पांडे यांना घटनास्थळी जाऊन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यानंतर सत्य काय हे समोर येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.