
Crime News : अवघ्या १० रुपयांच्या नोटेवरुन तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं; फरार आरोपीला अटक
लुधियानाच्या हैबोवाल भागात बुधवारी रात्री उशिरा १० रुपयांच्या नोटेवरून झालेल्या वादातून एका ३६ वर्षीय व्यक्तीला पेटवून दिल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला.
शेखर कुमार असं पीडित तरुणाचे नाव असून त्याचं भाजीचं दुकान आहे. आरोपी रवी शर्माने शेखरवर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचा आरोप आहे. शेखरने १० रुपयांची फाटलेली नोट दिल्यानंतर रवी संतापल्याने हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
यामध्ये शेखरच्या पाठीला, खांद्यावर आणि डोक्याला भाजलं आहे. घटनेनंतर आरोपी रवी शर्मा घटनास्थळावरून पळून गेला असून त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली.
शर्मा हा मूळचा राजस्थानचा असून दीड महिन्यांपूर्वी लुधियाना येथे स्थलांतरित झाला होता आणि भाड्याच्या घरात राहत होता. शेखरचा भाऊ राजेश कुमार याच्या जबाबावरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राजेशने पोलिसांना सांगितलं की, त्याचा भाऊ चिट्टी कोठीजवळ भाजीचे दुकान चालवतो. बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास रवी शर्माने २० रुपयांचा मुळा विकत घेतला.
राजेश पुढे म्हणाला की, रवीने ५० रुपयांची नोट दिली. शेखरने रवीला ३० रुपये परत केले. त्यातील १० रुपयांची एक नोट फाटलेली होती. आरोपींनी शेखरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि फाटलेली नोट राजेशच्या तोंडावर फेकली.
पुढे राजेश पुढे म्हणाला की त्याने हस्तक्षेप केल्यावर आरोपी तेथून निघून गेला पण काही वेळाने नातेवाईकांसोबत परतला. त्यांनी हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि शेखर आणि रवी यांना हस्तांदोलन करण्यास आणि एकमेकांना मिठी मारण्यास सांगितलं. दरम्यान, रवीने त्याच्याजवळ असलेल्या बाटलीतून पेट्रोल ओतून शेखरला पेटवून दिलं.