esakal | ऑक्सिजनबाबत दिशाभूल केल्याने गुन्हा; ट्विटनंतर तरुण चक्क झोपला

बोलून बातमी शोधा

tweet
ऑक्सिजनबाबत दिशाभूल केल्याने गुन्हा; ट्विटनंतर तरुण चक्क झोपला
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

अमेठी - ऑक्सिजनच्या गरजेबाबत दिशाभूल करणारी माहिती देऊन भीती निर्माण केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी एका व्यक्तीवर साथरोग कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

काय घडले नेमके?

शशांक यादव असे त्याचे नाव आहे. ८८ वर्षांच्या नातेवाइकासाठी शक्य तेवढ्या लवकर ऑक्सिजन सिलिंडरची गरज असल्याचे ट्विट त्याने केले होते. अभिनेता सोनू सूद याला त्याने टॅग केले होते. ते पाहून अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी प्रतिसाद दिला, मात्र शशांकला ट्विटमधील क्रमांकावर तीन वेळा दूरध्वनी करूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी जिल्हा दंडाधिकारी आणि अमेठी पोलिसांना सूचना देऊन ही व्यक्ती शोधून त्याला मदत करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

पोलिसांनी ट्विटद्वारेच स्पष्ट केले की, यादवने संबंधित रुग्णाला कोरोना झाला आहे का हे नमूद केले नव्हते. प्रत्यक्षात त्याला संसर्ग झाला नव्हता, तसेच त्याला ऑक्सिजनची गरजही नव्हती. सोमवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले. असे ट्विट निषेधार्ह आहेच आणि तो गुन्हा सुद्धा आहे.यादवला या कायद्याच्या ४१व्या कलमाखाली नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार संबंधित व्यक्तीने पोलिसांसमोर हजर होणे आवश्यक असते. त्याने भविष्यात असा गुन्हा करू नये हा यामागील उद्देश असतो. यादवची चौकशी करून नंतर त्याला सोडून देण्यात आले.

मुख्य वैद्यकीय अधिकारी आशुतोष दुबे यांनी सांगितले की, यादवचे नातेवाईक खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्याला नजीकच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण ऑक्सिजनअभावी त्याचा मृत्यू झाला नाही.

चक्क झोपला होता

अमेठीचे पोलिस अधिक्षक दिनेश सिंह यांनी सांगितले की, यादवने दूरच्या नातेवाइकासाठी हे ट्विट केले होते. त्याने आमचा कॉल उचलला नाही तेव्हा त्याला काहीतरी समस्या असावी असे वाटले. नंतर आम्ही टेहळणी करून त्याचा ठावठिकाणा शोधला. त्यानुसार आम्ही त्याच्या घरी पोचलो तर तो झोपला असल्याचे आढळून आले.