कर्नाटकपाठोपाठ काँग्रेसला आणखी एक झटका; दहा आमदार करणार भाजपत प्रवेश

अवित बगळे
Wednesday, 10 July 2019

गोव्यात मोठी राजकीय घडामोड

पणजी : गोवा विधानसभेच्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधानसभा अधिवेशनापूर्वी कॉंग्रेसचे 15 पैकी 10 आमदार फुटले आहेत. रात्री ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यानंतर त्यापैकी काहींचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.

गोव्याच्या राज्यपाल सध्या दिल्लीत असून त्या तातडीने गोव्यात येण्यास निघाल्या आहेत. त्या मध्यरात्री गोव्यात पोचतील त्यानंतर किंवा सकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो.

कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही फूट पडली असून त्यांच्यासोबत आतानासिओ मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, फांसिस सिल्वेरा, इजिदोर फर्नांडिस, आतोनिओ फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, नीळकंठ हळर्णकर, क्लाफासिओ डायस आणि विल्फेड डिसा हे आमदार आहेत.

त्यामुळे कॉंगेसकडे प्रतापसिंह राणे, रवी नाईक, लुईझिन फालेरो, दिगंबर कामत आणि आलेक्स रेजिनाल्ड हेच आमदार राहणार आहेत. त्यापैकी रेजिनाल्ड वगळल्यास इतर सर्व माजी मुख्यमंत्री आहेत.

सभापती राजेश पाटणेकर हे डिचोलीहून पर्वरी विधानसभा संकुलात येण्यास निघाले आहेत. ते पोचल्यावर हा गट भाजपमध्ये विलीन केला जाणार आहे. याआधी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांनाही भाजपने याच पद्धतीने प्रवेश दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crisis for Congress grows as 10 Goa MLAs approach Speaker to join BJP