कोरोनावर चर्चा अन भाभीजी के पापड!; राज्यसभेत टीका अन् प्रत्युत्तर

कोरोनावर चर्चा अन भाभीजी के पापड!; राज्यसभेत टीका अन् प्रत्युत्तर

नवी दिल्ली - पुढील वर्षीच्या सुरवातीला कोरोनावरील लस येण्याची आशा असली तरी १३५ कोटींच्या देशात लस ही जादूची कांडी ठरू शकत नाही. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत मास्क, सामाजिक अंतरभान, हात स्वच्छ करणे व सॅनिटायजर ही चतुःसूत्री प्रत्येकाने कायम पाळणे अत्यावश्‍यक आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत सांगितले. आरोग्य दिशानिर्देशांचे पालन करण्यात ग्रामीण भारत आघाडीवर आहे, मात्र अनेक शहरांत बेफिकीरी दिसते, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, महाराष्ट्रात हजारो लोक कोरोनामुक्तही झाले आहेत. इतके सारे लोक ‘काय भाभीजी के पापड खाऊन बरे झाले का ?’ अशा शब्दांत शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपला धारेवर धरले. राऊत यांना प्रत्युत्तर देताना भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी, चरखा चालवून इंग्रज देशातून गेले का ? असा प्रतिप्रश्‍न केला. अशा मोठ्या लढायांमध्ये चरखा, दिवे, ताली-थाळी ही केवळ प्रतीके असतात हे टीका करणारांनी समजून घ्यावे, असा टोला त्यांनी लगावला. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी, बिकानेरचे भाभीजी के पापड खाऊन कोरोना बरा होतो, असे अचाट वक्तव्य केले होते. त्याचा राऊत यांनी आज भाजपविरुद्ध चपखलपणे वापर केला. ही राजकीय नाही तर लोकांचे जीव वाचविण्याची लढाई असल्याचे सांगून राऊत यांनी, आपली ८० वर्षीय आई व छोटा भाऊ कोरोनाग्रस्त झाल्याने अतिदक्षता विभागांत उपचार घेत असल्याचे सांगितले. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही मुंबई नगरपालिकेची प्रशंसा केली आहे व येथे काही सदस्यांनी केवळ पक्षीय आकसातून महाराष्ट्र सरकारवर टीका केली. 

संक्रमण साखळी तोडणे गरजेचे 
संसदेत आल्यावर अनेकांसाठी देशापेक्षा त्यांची पक्षीय भूमिकाच सर्वांत प्राधान्याची का होते या शब्दांत डॉ. हर्षवर्धन यांनी खंत व्यक्त केली. कोरोनाची संक्रमण साखळी तोडणे अती गरजेचे असून मास्क हा माणसाचा सर्वांत मोठा रक्षक असल्याचे सांगून ते म्हणाले, की देशात बरे होण्याचा दर ७८ ते ७९ टक्के वाढला असून मृत्युदर जगात सर्वात कमी १.६ टक्‍के झाल्याचे सांगून, ते म्हणाले की देशातील रुग्णसंख्या ५० लाख दिसत असली तरी सक्रिय रुग्ण १० लाखच (२० टक्के) आहेत. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली व डब्ल्यूएचओशी समन्वय साधून एक तज्ज्ञ गट तीनही भारतीय लशींचे अध्ययन करत आहे. मात्र पुढील वर्षाच्या प्रारंभी लस आली तरी १३५ कोटी भारतीयांना एका मिनीटांत लसीकरण करणे शक्‍य नाही त्यासाठी प्रत्येकाने शिस्त पाळून, मास्क वापरून कोरोना संक्रमण साखळीच तोडावी लागेल. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

१७०० प्रयोगशाळा उभारल्या 
लॉकडाउनच्या काळातही देशात १७०० तपासणी प्रयोगशाळा उभ्या राहिल्या. केंद्राने कोणताही भेदभाव न करता राज्यांना सातत्याने मदत केली आहे. पीपीई कीट तयार करणाऱ्या ११० कंपन्या, २५ व्हेंटिलेटर्स उत्पादक कंपन्या व १० मास्क उत्पादक सध्या आहेत. लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांना त्रास झाल्याची कबुली देऊन ते म्हणाले, की गृह मंत्रालयाने वेळेवर याची दकल घेऊन ६४ लाख मजुरांना विशेष रेल्वेगाड्या चालवून त्यांच्या राज्यांत पोहोचविले. 

चौथ्या दिवशीच ध्वनियंत्रणेत बिघाड 
एका ऐतिहासिक परिस्थितीत होणाऱ्या या अधिवेशनासाठी संसदेच्या यंत्रणांनी गेला किमान महिनाभर तयारी केली होती. खासदार दोन्ही सभागृहांत बसणार असल्याने वक्‍त्यांचा आवाज ऐकू येण्यासाठी लोकसभा व राज्यसभेत एक विशेष केबल टाकण्यात आली व त्या यंत्रणेच्याही अनेकदा चाचण्या घेतल्या गेल्या. मात्र ध्वनियंत्रणेत चौथ्या दिवशीच बिघाड झाला. डॉ. हर्षवर्धन बोलत असताना त्यांचा आवाज राज्यसभेत ऐकू येणेच बंद झाले. त्यांना याची कल्पनाच नसल्याने ते बोलतच राहिले. उपसभापती हरिवंश यांनी नंतर याची कल्पना दिल्यावर हर्षवर्धन म्हणाले की , माहिती नाही केंव्हा माझा माईक बंद झाला किंवा बंद केला गेला? असे उपरोधिकपणे सांगितले. त्यावर हशा पिकला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com