कर्नाटकमध्ये नेत्यांची कोट्यवधींची उड्डाणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

मुख्यमंत्र्यांची संपत्ती सात कोटींनी वाढली

मुख्यमंत्र्यांची संपत्ती सात कोटींनी वाढली

बेळगाव: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे आता तेथील नेत्यांची कोट्यवधींची उड्डाणे पुन्हा चर्चेत आली आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची 20 कोटी 36 लाख रुपयांची मालमत्ता असूनही त्यांनी माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या जावयाकडून काही रक्‍कम घेतल्याचे दाखविले आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात त्यांच्या संपत्तीत सात कोटींची वाढ झाली आहे; तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीची मालमत्ता जास्त असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे 215 कोटींचे मालक असूनही त्यांच्याकडे स्वतःची मोटार नाही.

जलसंपदामंत्री एम. बी. पाटील 104 कोटी 92 लाख, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदीश रेड्डी 309 कोटी, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे के. बागेगौडा 318 कोटी, कॉंग्रेसचे उमेदवार ए. सी. श्रीनिवास 104 कोटी, शामनूर शिवशंकरप्पा 183 कोटी, त्यांचे पुत्र एस. मल्लिकार्जुन यांच्याकडे 113 कोटींची संपत्ती आहे. कर्नाटकातील या कुबेरपुत्रांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या संपत्तीत पाच वर्षांच्या कालावधीत सात कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्याकडे 350 ग्रॅम सोने; तर दोन किलो चांदी आहे. त्यांनी पुत्र यतिंद्र यांना 78 लाख, तर पत्नी पार्वती यांना 2.26 कोटी रुपये दिले आहेत.

कुमारस्वामींकडे वाहनच नाही
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष कुमारस्वामी यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. त्यांनी पत्नी अनिता यांना सहा कोटी 51 लाख रुपये दिले आहेत; तर इतरांचे दोन कोटी 94 लाख रुपयांचे कर्ज त्यांच्यावर आहे. कुमारस्वामी यांच्यापेक्षा अनिता यांची मालमत्ता जास्त असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. कस्तुरी मीडिया कंपनीत त्यांनी 68.72 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. संचालिका म्हणून त्यांना वार्षिक एक कोटी दोन लाख रुपयांचे मानधन मिळते. कुमारस्वामी यांच्याकडे रोख 12 लाख; तर अनिता यांच्याकडे 42 लाखांची रोकड आहे.

उद्योगमंत्र्यांची अशीही भरारी
कुमारस्वामी यांच्याप्रमाणेच मंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. देशपांडे यांच्या पत्नी राधा यांची मालमत्ता त्यांच्यापेक्षाही जास्त असल्याचे दिसून येते. गुंतवणूकदार असलेल्या राधा यांची संपत्ती 112 कोटी 26 लाख रुपये आहे; तर "आरव्हीं'च्या नावावर 22 कोटी 69 लाखांची संपत्ती आहे. या दोघांच्या नावावर संयुक्तरीत्या 50 कोटी तीन लाखांची संपत्ती आहे. आश्‍चर्य म्हणजे दावणगिरी दक्षिण मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार शामनूर शिवशंकरप्पा हे 183 कोटींचे मालक आहेत. पण, त्यांच्याकडे राहण्यासाठी घर आणि फिरण्यासाठी चारचाकी वाहन नाही. त्यांच्या नावावर 63 कोटी 47 लाखांचे कर्ज आहे; तर एक कोटी 57 लाख रुपयांचे दागिने आहेत.

Web Title: crores of leaders in Karnataka