राया येथे क्रॉसची तोडफोड; पोलिस यंत्रणेला पुन्हा आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

गेल्यावर्षी राज्यात रस्त्याच्या बाजूला असलेल्या तसेच दफनभूमीतील क्रॉसची तोडफोड प्रकरणांमुळे गोव्यात खळबळ माजली होती.

गोवा - बारेभाट-राया (सासष्टी) येथील सेंट कॅजेटन चॅपेजसमोर असलेल्या क्रॉसची काल रात्री अज्ञातांनी मोडतोड केली. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यावर चर्चच्या समितीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथकचा वापर केला तसेच काही अज्ञातांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत. गेल्यावर्षी राज्यात रस्त्याच्या बाजूला असलेल्या तसेच दफनभूमीतील क्रॉसची तोडफोड प्रकरणांमुळे गोव्यात खळबळ माजली होती. सुमारे एक डझनहून अधिक क्रॉस मोडतोड केल्याची प्रकरणे नोंद झाली होती व पोलिसांची संशयिताने झोप उडवून दिली होती.

संशयित फ्रांसिस परेरा याला पकडण्यास पोलिसांना यश आले होते व त्याच्याविरुद्ध आरोपपत्रे दाखल करण्यात आली होती. आतापर्यंत सुनावणी पूर्ण झालेल्या आरोपपत्रांवरील संशयिताची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे व अजून काही प्रकरणांची सुनावणी न्यायालयात बाकी आहे. त्यामुळे फ्रांसिस परेरा याचा कालच्या या क्रॉसच्या तोडफोडीच्या प्रकरणाशी संबंध आहे का? याची चौकशी पोलिस करत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Cross breaks down at Raya Goa