जवानांप्रमाणेच श्वानालाही CRPFची सलामी

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

जंगलात माओवाद्यांनी ‘आयईडी’ प्रकारची स्फोटके लपवून ठेवलेली असतात. या सैन्यांसाठी सर्वात मोठा धोक असतो. हे शोधण्यासाठी या जातीच्या श्वानांना प्रशिक्षण देण्यात येते. हे श्वान अचूकपणे बाँब शोधतात. 

रायपूर : झारखंडमध्ये माओवाद्यांशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या अॅमिनिका नावाच्या श्वानाला केंद्रीय राखीव पोलिस (CRPF) दलाने हुतात्मा जवानाप्रमाणे आदरांजली वाहिली. कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या जवानांप्रमाणेच या श्वानालाही आदरांजली वाहण्यात आली. 

माओवाद्यांच्या कारस्थानांमुळे अशांत असलेल्या झारखंडमध्ये यावर्षी सुरवातीला अॅमिनिका नावाच्या एका श्वानाचा बाँब शोधताना मृत्यू झाला होता. मृत्यू होण्यापूर्वी या श्वानाने ५० किलो इतकी स्फोटके शोधली होती.अॅमिनिका ही बेल्जियम मॅलिन्वा जातीच्या श्वानाची मादी होती. तिचा मृतदेह ठेवण्यात आलेल्या शवपेटीवर राष्ट्रध्वज गुंडाळण्यात आला होता. तिला 18 फैरी झाडून सलामी देऊन शाही इतमामात तिचे दफन करण्यात आले. तसेच, दफनभूमीवर स्मृतिफलक लावून त्यावर तिची कामगिरी कोरण्यात आली आहे. 

पहिल्यांदा 2013 मध्ये बेल्जियम मॅलिन्वा या जातीचे श्वान CRPFमध्ये दाखल करण्यात आले. आता जवळपास 284 बेल्जियम मॅलिन्वा CRPFच्या जवानांना माओवाद्यांशी लढण्यात मोलाची मदत करीत आहेत. जमिनीखाली पेरलेले बाँब, सुरूंग शोधून काढण्याची महत्त्वाची जबाबदारी हे श्वान चपळाईने पार पाडतात.

याशिवाय आणखी 45 श्वानांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. माओवाद्यांच्या प्रभाव असलेलापरिसर रेड कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. तब्बल दहा राज्यांमध्ये रेड कॉरिडॉर पसरला असून, येथे मोठ्या प्रमाणावर CRPFची कुमक तैनात करण्यात आली आहे. 
 

Web Title: The CRPF gives service dogs the same respect as jawans killed in action