सोनियांच्या सुरक्षेची सूत्रे ‘सीआरपीएफ’ने स्वीकारली

पीटीआय
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका यांच्या सुरक्षेची जबाबदारी आज केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे (सीआरपीएफ) हस्तांतरित करण्यात आली. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांना पुरविण्यात येत असलेली स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुपची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला होता.

राहुल, प्रियांकांच्या निवासस्थानीही कमांडो दाखल
नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका यांच्या सुरक्षेची जबाबदारी आज केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे (सीआरपीएफ) हस्तांतरित करण्यात आली. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांना पुरविण्यात येत असलेली स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुपची (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला होता. 

या तिन्ही नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफच्या अति-अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या सुरक्षा पथकाकडे देण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. या तीनही नेत्यांना आता झेड-प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. 

सीआरपीएफच्या कमांडोंनी आज ‘१०, जनपथ’वरील सोनिया यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेची सूत्रे स्वीकारली. राहुल आणि प्रियांका यांच्या निवासस्थानीही सीआरपीएफचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. पुढील काही दिवस सीआरपीएफच्या पथकाला एसपीजीकडून साहाय्य केले जाईल. त्यानंतर सीआरपीएफ स्वतंत्रपणे ही जबाबदारी सांभाळणार असल्याचे सांगण्यात आले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यानंतर गांधी कुटुंबातील सोनिया, राहुल आणि प्रियांका यांना एसपीजीची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. आता २८ वर्षांनंतर या तिघांचे एसपीजी कवच हटविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crpf security for sonia gandhi