इफ्फी; दहशतवादाचा क्रूर चेहरा आणि प्रेमाचे रंग

इफ्फी; दहशतवादाचा क्रूर चेहरा आणि प्रेमाचे रंग

पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) तिसरा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवादाचा एक वेगळाच चेहरा समोर आणणारा "डिव्हाइन विंड' या अल्जेरियाच्या व अनोख्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या युक्रेनच्या "व्हेन द ट्रिज फॉल्स' या दोन चित्रपटांनी गाजवला. प्रेक्षकांना आजही रांगांमध्ये ताटकळावे लागले असले, तरी प्रेक्षागृहात सोडण्याच्या वेळांत बदल केल्याने उन्हात ताटकळण्याचे प्रमाण थोडे कमी झाले. 

आयसीस या दहशतवादी संघटनेच्या कारवाया आणि त्यांचे खोलपर्यंत पसरलेले जाळे याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. या संघटनेच्या कार्य करण्याच्या अमानुष पद्धतीबद्दल "डिव्हाइन विंड' या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. अमीन या अल्जेरियातील सहारा वाळवंटातील टिमिमीन या शहरात राहणाऱ्या अमीन या युवकाची कथा चित्रपट सांगतो. वडिलांशी पटत नसलेल्या व नोकरीच्या शोधात असलेल्या अमीनला आयसीस या संघटनेबद्दल इंटरनेटवरून माहिती मिळते. तो नूर या आयसीस संघटनेसाठी काम करणाऱ्या तरुणीच्या संपर्कात येतो. नूर थेट अमीनच्या घरी पाहुणी म्हणून प्रवेश करते. ती हळूहळू अमीनचा बुद्धिभेद करून एका तेलशुद्धीकरण कारखान्यावर दहशतवादी हल्ला करण्यासाठी त्याला तयार करते.

दहशतवाद्यांची कार्यपद्धती व त्यांच्या प्रशिक्षणाबद्दल चित्रपटात माहिती देण्यात येते. अमीनच्या आयुष्याची कथा हळूहळू वळणे घेते व नूरच्या आगमनानंतर त्यामध्ये मोठा बदल घडतो. सुरवातीला अत्यंत संथ लयीत चालणारा हा चित्रपट हल्ल्याची योजना आकार घेताना तुफान वेग पकडतो. चित्रपटाचा शेवट जगभरातील दहशतवादी हल्ल्यांमागचे सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. कथेची मांडणी, कृष्णधवल रंगांतील फ्रेम्समधून उभे केलेले घटनेचे गांभीर्य आणि मोजक्‍या कलाकारांच्या मदतीने उभा केलेला थरार यांमुळे चित्रपटाला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली. 

युक्रेनच्या "व्हेन द ट्रिज फॉल्स' या चित्रपटात पारंपरिक मूल्ये पाळणाऱ्या घरातील तरुणी लॅरिसा व तिचा जिप्सी प्रेमी स्कार यांची अनोखी प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. युक्रेनमधील घनदाट जंगलांतील छायाचित्रण, वेगवान कथानक व शेवट यामुळे चित्रपट वेगळा ठरला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील या दोन्ही चित्रपटांनी स्पर्धेत आपण खूपच पुढे असल्याचेच अधोरेखित केले. महोत्सवातील वर्ल्ड पॅनोरमामधील "कॉलेट' हा फ्रान्सच्या विख्यात लेखिकेच्या कॉलेट यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट कथा व निर्मितीमूल्यांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com