नोटाबंदी हा ‘दहशतवादी हल्ला’ - राहुल गांधी

पीटीआय
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. हे मत मी निर्णय झाल्या झाल्यादेखील व्यक्त केले होते. नामवंत अर्थतज्ज्ञ, सामान्य नागरिक आणि तज्ज्ञांनाही हे पटले आहे. 
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल

नवी दिल्ली - केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता आणि या हल्ल्याच्या सूत्रधारांना अद्याप शासन झालेले नाही, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केली. ‘तीन वर्षांपूर्वी नोटाबंदीच्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त होऊन लाखो लोकांचे रोजगार गेले, छोट्या व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले,’ असे राहुल यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 

‘डिमॉनेटायझेशन डिझास्टर’ या नावाचा हॅशटॅग वापरत राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भाजपवर निशाणा साधला आहे. या जीवघेण्या हल्ल्याच्या सूत्रधारांना शासन झाले नसल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी नोटाबंदीवरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘मोदी हे सध्याच्या काळातील तुघलक’, असे त्यांनी म्हटले आहे. नोटाबंदी हा केंद्र सरकारला चांगला निर्णय वाटत असेल तर आज या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना नेते याबाबत शांत का आहेत?, असा सवालही सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: currency ban is big terrorist attack rahul gandhi