नोटाबंदीचा रशियाकडून निषेध

पीटीआय
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या रोकड टंचाईचा फटका रशियाच्या दूतावासाच्या कामकाजावर होत असून, याचा रशियाने कठोर शब्दांत निषेध केला आहे. यावर तातडीने तोडगा न काढल्यास मॉस्कोतील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करण्याचा पर्याय वापरण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

भारतातील रशियाचे राजदूत अलेक्‍झांडर कदाकिन यांनी याविषयी परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठविले आहे. पैसे काढण्यावरील मयार्देमुळे दूतावासाचे दैनंदिन कामकाज विस्कळित झाले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यात हस्तक्षेप करून राजनैतिक अधिकाऱ्यांना पैसे काढण्याची मर्यादा शिथिल करावी, अशी मागणी पत्रात केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप पत्राचे उत्तर दिले नसून, लवकरच हा प्रश्‍न सुटेल, अशी आशा आहे. हा प्रश्‍न न सुटल्यास अन्य पर्यायांचा विचार करावा लगेल आणि यात मॉस्कोतील वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यात येईल, अशी माहिती रशियाच्या दूतावासातील अधिकाऱ्यांनी दिली. अन्य पर्यायांमध्ये रशियात नियुक्त असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांना पैसे काढण्यावर निर्बंद लादण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.

भारतातील रशियाच्या दूतावासात दोनशे जण कार्यरत आहेत. या तक्रारीबद्दल भारताच्या वतीने अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. याआधी युक्रेन आणि कझाकस्तानच्या दूतावासांनी नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्याचा निषेध केला आहे.

आर्थिक कामकाज विभागाकडून निर्णय नाही
गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाने आर्थिक कामकाज विभागाकडे तीन ते चार विनंत्या केल्या आहेत. यात नोटाबंदीनंतर दूतावासांना पुरेशा पैशाचा पुरवठा करण्याचा विनंतीचा समावेश होता. यावर अद्याप आर्थिक कामकाज विभागाने निर्णय घेतलेला नाही.

Web Title: currency ban protest by rasia