नोटा बदलल्या, विचार बदलूया!

नोटा बदलल्या, विचार बदला
नोटा बदलल्या, विचार बदला

मोदी सरकारने 8 नोव्हेंबरच्या रात्री चलनातील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याचे जाहीर केले. सगळीकडे हल्लकल्लोळ माजल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पेट्रोल पंप, रुग्णालये, औषध विक्रेते अशा अतिमहत्वाच्या ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जातील असेही जाहीर करण्यात आले. मात्र जुन्या नोटा रद्द झाल्याची बातमी झळकल्याने बहुतेक अतिमहत्वाच्या ठिकाणी या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून बॅंका आणि पोस्ट कार्यालयात नोटा बदलून देण्यास सुरुवात करण्यात आली. शिवाय एटीएम्समधून रोख रक्कम काढण्याची सुविधा सुरूच होती. नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर आठ दिवसांनीही गर्दी म्हणावी तेवढी कमी झाल्याचे चित्र दिसत नाही. त्या 'आमचं काय चुकलं?' असा सहज विचार मनात येणं साहजिकच आहे. त्या अनुषंगाने खालील मुद्दे अधोरेखित करावेसे वाटतात.

  1. मोदी सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर काही मिनिटांतच सर्व एटीएममध्ये गर्दी झाली. एरवी एकाच वेळी हजारो रुपये काढणाऱया नागरिकांनी त्यादिवशी शंभर रुपयांच्या नोटा मिळाव्यात म्हणून चारशे रूपये अनेकदा काढले. आवश्‍यकता नसताना शिकल्या-सवरल्या लोकांनी भीतीपोटी शंभर रुपयांच्या नोटा काढून घेतल्या; तेथे जरा श्रद्धा-सबुरी दाखविली असती तर?
  2. दुसऱ्या दिवशीपासून नागरिक बॅंका आणि पोस्ट कार्यालयात नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी करू लागले. काही ठिकाणी एकच व्यक्ती वेगवेगळ्या बॅंका, पोस्ट कार्यालयातून दोन-दोन वेळा नोटा बदलून घेत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते. एकावेळी चार हजार रुपये बदलून मिळणार होते. खरोखरच एकाच दिवशी आठ हजार रुपये रोखीची गरज इतक्या साऱयांना एकाच वेळी होती का?
  3. जेथे "कॅशलेस' व्यवहार अवघड असतात, अशा ठिकाणी म्हणजेच प्रवासामध्ये, भाजीपाला खरेदी करताना, किराणा दुकाने आदी ठिकाणांसाठी रोख रकमेची कमतरता होती. त्याचवेळी अशीही काही ठिकाणे होती, जेथे ग्राहकांना भाजीविक्रेते, किराणा दुकानदार उधारीने देण्यास तयार होते. अशा परिस्थितीतही उधार घेण्यापेक्षा रांगेत थांबून नोटा बदलण्यावरच लोक भर देत होते. नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा उधारी घेता आली असती ना!
  4. नोटा बंद झाल्याने काळा पैसाधारक सैरभैर झाले. त्यामुळेच ते काळा पैसा पांढरा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या शोधात आहेत. शिकले-सवरलेले लोक काळा पैसा पांढरा करण्यासाठी टक्‍क्‍यांची भाषा बोलत आहेत. बऱ्याच ठिकाणी हेच लोक बॅंकेत रक्कम टाकण्यासाठी गर्दी करत आहेत. जमा केल्यानंतर पुन्हा दररोज जेवढे शक्‍य आहेत तेवढे पैसे काढून परतावा देत आहेत. हे चित्र सगळीकडेच असेल असे नाही. मात्र, बहुतेक ठिकाणी अशा चर्चा आणि चित्र दिसत आहेच ना. ते टाळता आले नसते का?
  5. पेट्रोलपंपांवर गर्दी झाली. त्यामुळे पेट्रोलपंपावर सुट्याच्या प्रश्‍न निर्माण झाला. नोटा बंद झाल्याने आहेत त्या नोटा लोक खपवू लागले. त्यासाठी गाडीत नको तेवढे पेट्रोल टाकण्यात आले. त्यामुळे पेट्रोल पंपांवर गर्दी झाली आणि त्यांनीही नोटा घेण्यास नकार दिला. त्यामुळे पंपांवर गर्दी वाढली आणि खरोखरच काहीतरी वेगळे घडत आहे असे लोकांना वाटू लागले आणि भीतीचे वातावरण पसरले. हे टाळता आले नसते का?

वरील प्रमुख बाबी सोडल्या तर या 8 नोव्हेंबरपूर्वी देखील आपण काही चुका केल्या आहेत. जरा व्यापक दृष्टिने पाहिले तर त्या ही आजच्या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे दिसून येईल.

  1. सरकारी खात्यांमध्ये नेहमीच आपली काही कामे असतात. अशा ठिकाणी आपण कोणावर तरी विश्‍वास ठेवतो आणि "पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत हो!' असे आपण गृहित धरतो. तेथे मग काम लवकर होण्यासाठी आपण पन्नास रुपयांपासून लाच देऊ लागतो. जी लाच आपण रोखीने देतो ती व्यवहारात दाखविली जात नाही. घेणाराही तो तशी व्यवहारात दाखवत नाही. त्यामुळे सरकार मोदींचे असो किंवा अन्य कोणाचेही काळा पैशाची निर्मिती होतेच. आपण वेळीच ही अशी लाच देणे टाळले असते तर सरकारला नोटा बंद करण्याची आणि आपल्याला आज रांगेत उभे राहण्याची गरज पडली असती का?
  2. आपण दुचाकी, चारचाकी चालवताना आपण बऱ्याचदा नियमांचा भंग करतो. त्यावेळी समोर कोपऱ्यात कोठेतरी "मामा' उभा असतो. तो अचानक आपल्यासमोर येतो आणि दंड मागू लागतो. मग आपण गयावया करू लागतो आणि 100-200 ची लाच देऊन वेळ मारून देण्याचा प्रयत्न करतो. तो ही पैसा कोठे व्यवहारात दाखविला जात नाही आणि तो काळा होता. हे टाळता आले नसते का?
  3. आपल्या परिसरात स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका असतात. त्यावेळी नेते आपल्या सोसायटीला मोफत रंगरंगोटी करून देण्याचे आमीष दाखवतात. आपण त्यास अगदी सहजपणे बळी पडतो. सोसायटीला रंगरंगोटी होते. आपल्याला त्यासाठी खर्चाचे भागीदार व्हावे लागत नाही. तो खर्च व्यवहारात दाखविला जात नाही. ते पैसे कोणी दिले? कोठून दिले? कसे दिले? याचा विचार आपण कधी करतो का?

राहिला प्रश्‍न दोन हजार रुपयांच्या नोटेचा...तर ज्यावेळी एखादा नवा पूलाचे बांधकाम काढले जाते, त्यावेळी त्या पुलाच्या शेजारून पर्यायी रस्ता किंवा पूल उपलब्ध करून देण्यात येतो. पर्यायी रस्ता हाच हमरस्ता नसतो, हे भान आपल्यालाही राहिलेले नाही.

येथे काळा पैसा निर्मिती होण्यामागच्या काही प्रातिनिधीक कारणांचा उल्लेख केला आहे. प्रत्येकच गोष्ट प्रत्येकालाच लागू पडेल असे नाही. मात्र कळत-नकळतपणे आपण या काळा पैसा निर्मितीच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असतोच. खरं तर विद्यमान सरकारऐवजी पूर्वीच्या सरकारनेच नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. अर्थात गर्दी झालीच असती. पण आतापर्यंत आपण आर्थिक उत्क्रांतीच्या एका वेगळ्या टप्प्यापर्यंत पोचलो असतो. असो. मोदी सरकारने हा धाडसी निर्णय घेतला आहे आणि त्यातून काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लाभ होतील ते येणाऱ्या काळात दिसून येतीलच.

बॅंकेतील गर्दी कमी होत आहे. लोकांना त्रास होत आहे. तरीही लोक आनंदित आहेत. "हे ही दिवस जातील' आणि आनंदाचे, सर्वसामान्यांच्या समृद्धीचे आणि भरभराटीचे दिवस येतील. पर्यायाने आपला भारत देश परमवैभवाकडे भरारी घेऊ शकेल. त्यामुळे या आणि यासारख्या अनेक क्रांतिकारी निर्णयांना आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जाण्यास सज्ज होणे काळाची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com