पाचशे, हजारच्या नोटा तडकाफडकी रद्द

पाचशे, हजारच्या नोटा तडकाफडकी रद्द

नवी दिल्ली - काळा पैसा आणि अवैध व्यवहार रोखण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून (ता. ८) चलनातून बंद करण्यात आल्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जाहीर केला. दूरचित्रवाणीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी ही अतिमहत्त्वाची घोषणा केली. यातील एक हजाराच्या नोटा चलनातून पूर्णपणे बंद होणार असून, पाचशे रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येतील. तसेच दोन हजार रुपयांची नोटही चलनात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक
  काळ्या पैशाबाबत विशेष तपासणी पथक स्थापन
 परदेशांत ठेवलेला काळा पैसा साठ टक्के कर भरून तीन महिन्यांत जाहीर करण्यासाठी २०१५ मध्ये कायदा संमत.
 बॅंक व्यवहारांच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अमेरिकेसह अनेक देशांबरोबर करार.
 भ्रष्टाचारातून मिळालेल्या काळ्या पैशाला (बेनामी व्यवहार) आळा घालण्यासाठी ऑगस्ट २०१६ पासून कडक कायदा अस्तित्वात.
 मोठा दंड भरून काळा पैसा जाहीर करण्यासाठी योजना

सध्याच्या नोटा करा बँकेत, पोस्टात जमा
 ३० डिसेंबरपर्यंत मुदत
   पाचशे, हजारच्या नोटा बॅंका, टपाल कार्यालयांत १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान जमा करा 
   पाचशे व दोन हजारच्या नव्या नोटा चलनात येणार 
   काही दिवस बॅंकेतून पैसे काढण्यावर मर्यादा 
   बॅंकेतून एका दिवशी दहा हजार, तर आठवड्याला एकूण वीस हजार काढता येणार 
   जुन्या नोटा बदलण्यासाठी आधार, पॅन कार्डसारखे सरकारी ओळखपत्र आवश्‍यक 
   नोटा बदलण्यासाठी १० ते २४ नोव्हेंबर दररोज चार हजारांची मर्यादा 
   २५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत ही मर्यादा वाढणार  
   ३० डिसेंबरनंतर नोटा जमा करण्यासाठी घोषणापत्र आवश्‍यक 
   एटीएम उद्या (ता.९) व काही भागात १० नोव्हेंबरला बंद 
   एटीएममधून पैसे काढण्यावर प्रतिदिन २ हजार मर्यादा 
   काही दिवसांनतर ही मर्यादा ४ हजारांवर नेणार 
   मानवतावादी दृष्टिकोनातून ७२ तास सवलत 
   सरकारी रुग्णालये, सरकारी रुग्णालयांतील औषध दुकाने (डॉक्‍टरांच्या प्रीस्क्रिप्शनसह) नोटा स्वीकारणार 
   रुग्णांच्या कुटुंबीयांना याचा फायदा होणार 
   रेल्वे तिकीट बुकिंग, सरकारी बस, विमान तिकिटासाठी जुन्या नोटा स्वीकारणार 
   सरकारी कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर नोटा स्वीकारणार 
   स्मशानभूमीत नोटा स्वीकारणार 
   या सर्वांना जुन्या नोटांचे तपशील ठेवावे लागणार 
   धनादेश, डिमांड ड्राफ्ट, डेबिट, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकिंगवर कोणतीही मर्यादा नाही

एक हजार आणि पाचशेच्या नोटांची ही मालिका रद्द करण्याचा सरकारने घेतला आहे. आम्ही अशा प्रकारच्या सरकारी निर्णयांची अंमलबजावणी आधीदेखील केली आहे. उद्या एटीएममधून एक हजार आणि पाचशेच्या नोटा काढून घेण्याचे काम करण्यात येणार आहेत. त्यासाठी बॅंकांचे कामकाज बंद राहणार आहे. 
- अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्ष, स्टेट बॅंक ऑफ इंडिया 

काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलाम.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मोदी सरकारने अतिशय धाडसी निर्णय घेतला आहे. हा एक सुखद धक्का आहे. पोस्टमार्टमपूर्वीचे हे महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत ५०० व १०० रुपयांच्या नोटांचे मूल्य सर्वाधिक म्हणजे ८५-८६ टक्के आहे. यानिमित्ताने काळ्या पैशाला आळा घालण्याच्या सरकारच्या धोरणाला पूरक असे पाऊल उचलले गेले आहे. यासाठी अर्थक्रांती प्रतिष्ठान गेली १६ वर्षे प्रयत्न करीत आहे. या चळवळीतील हा महत्त्वाचा टप्पा आहे. याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांचे मनापासून आभार मानतो.
- अनिल बोकील, प्रणेते, अर्थक्रांती प्रतिष्ठान

दररोज चार हजारांची मर्यादा 
पाचशे आणि हजारच्या नोटा बॅंका आणि टपाल खात्यात जमा करण्यासोबत त्या कमी रकमेच्या नोटांमध्ये बदलून मिळतील. यासाठी पॅन कार्ड, आधार आणि मतदार ओळखपत्र यासारखे सरकारी ओळखपत्र गरजेचे आहे. ही सुविधा १० ते २४ नोव्हेंबरपर्यंत असून, याला प्रतिदिन चार हजार रुपयांची मर्यादा असेल.

अखेरची मुदत ३१ मार्च 
पाचशे आणि हजारच्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत ज्यांना जाहीर करणे शक्‍य होणार नाही, त्यांना पुढील वर्षी ३१ मार्चपर्यंत घोषणापत्र देऊन ओळखपत्राच्या आधारे रिझर्व्ह बॅंकेच्या कार्यालयांकडे नोटा जमा करता येतील.

बेकायदा व्यवहार बंद
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्याने आता ऑनलाइन व्यवहारांचा वापर वाढणार आहे. परिणामी, अनेकांना आता व्यवहार ऑनलाइन करावा लागणार असल्याने सर्व व्यवहार कायद्याच्या चौकटीत येणार आहेत. परिणामी, बेकायदा व्यवहार बंद होण्यास मदत मिळेल. 

स्पष्टीकरण द्यावे लागणार
देशातील काळा पैसा आता उघड होण्याची शक्‍यता 
वाढली आहे. काळा पैसा बाळगणारे बरेच लोक पाचशे आणि हजाराच्या नोटा वापरतात. आता मोदी सरकारच्या या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्या लोकांना त्यांच्याकडील नोटा जमा करताना त्याबद्दलचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com