
Paytm च्या लाखों ग्राहकांना फटका; वैयक्तिक माहिती फुटल्याचा धक्कादायक अहवाल
नवी दिल्ली : पेटीएम मॉल दोन वर्षांपूर्वी हॅक झाले तेव्हा सर्व युजर आणि कंपनीचा डाटा सुरक्षित आणि अबाधित असल्याचा दावा कंपनीने केला असला तरी त्याबाबत आता धक्कादायक अहवाल आला आहे. त्यावेळी तब्बल ३० लाख ४० हजार युजरच्या अकाऊंटना फटका बसल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये हा प्रकार घडला होता. याबाबतची आकडेवारी हॅव आय बीन प्वंड या संकेतस्थळाने उपलब्ध केली आहे. डाटाच्या सुरक्षेचा भंग होतो तेव्हा आपली वैयक्तिक माहिती उघड झाली का हे या संकेतस्थळावर तपासता येते.ट्रॉय हंट यांनी तयार केलेल्या या संकेतस्थळानुसार ३० लाख ४० हजार युजरचे नाव, फोन नंबर, लिंग, जन्मतारीख, उत्पन्नाचा टप्प्यानुसार तपशील आणि पूर्वीची खरेदी अशी माहिती उघड झाली. तब्बल ७७ टक्के युजरचा तपशील या संकेतस्थळावर आधीच नोंदविला गेला होता.
पेटीएमचे दावे काय होते ?
अहवालावर पेटीएमने प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा पेटीएमच्या प्रवक्त्याने छातीठोकपणे वक्तव्य केले होते. डाटा सुरक्षेसाठी गुंतवणूक केली जाते. हॅकच्या शक्यतेच्या दाव्यांबाबत पडताळणी सुरु आहे. आमच्याकडे बग बाऊंटी उपक्रम आहे. त्यानुसार आम्ही सुरक्षा भंग उघड केल्यास इनामही देतो. सुरक्षा संशोधन समुदायाच्या साथीत काम चालते. रक्षाविषयक विसंगतींचे निर्धोकपणे निराकरण करतो, असे सांगण्यात आले होते.
तुमची माहिती लीक झाली का?
मोझीलाच्या फायरफॉक्स मॉनीटरकडून युजरना एक लिंक दिली जाते. त्यावर त्यावर इमेल आयडी आणि/किंवा फोन नंबर दिल्यास तुमचा इमेल अॅड्रेस आणि पासवर्ड हॅकच्यावेळी लीक झाला का हे तपासता येते. तुमची वैयक्तिक माहिती इतरत्र पुरविली गेली का हे सुद्धा कळते.
PayTm ने आरोप फेटाळले
पेटीएम मॉलने प्रसिद्धीपत्रक काढून आरोप फेटाळले आहेत. ‘युजर्सचा डेटा सुरक्षित असून २०२० मध्ये डेटा लीक झाल्याचे वृत्त निराधार आहेत. haveibeenpwned.com वर खोटी माहिती अपलोड करण्यात आली आणि यामुळे फायरफॉक्स ब्राऊजरमध्ये डेटा लीकचा अलर्ट आला. यासंदर्भात आम्ही फायरफॉक्सच्या टीमशी संपर्कात आहोत’, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.
Web Title: Cyber Crime Paytm Customers Affected Report Of Personal Data Breach Delhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..