निव्वळ आश्‍वासने दिल्यानेच मिस्त्रींची हकालपट्टी?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

एकंदरच, असमाधानकारक कामगिरी, संवेदनशील परिस्थितीची चुकीची हाताळणी, विभिन्न कार्य संस्कृतीचा संघर्ष, मूल्यांचा ऱ्हास आणि धोरणांमध्ये घेतलेला युटर्न, अशा विविध कारणांमुळे मिस्त्री यांना बाहेरचा दरवाजा दाखविण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे

मुंबई - सायरस मिस्त्री यांची टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदावरुन अवचित हकालपट्टी करण्याच्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या निर्णयामागील कारणीमीमांसा करण्याचा प्रयत्न अद्यापी सुरु आहे. यासंदर्भात विविध अंदाज व शक्‍यता वर्तविण्यात येत आहेत. मात्र रतन टाटा यांच्या निकटवर्तीयांमध्ये यासंदर्भात झालेल्या चर्चेमध्ये मिस्त्री यांना "टाटा ट्रस्ट्‌स‘चा विश्‍वास अबाधित राखण्यात अपयश आल्याने ही हकालपट्टी झाल्याचा सूर व्यक्त झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 

 

रतन टाटा हे टाटा ट्रस्ट्‌सचे आजीवन अध्यक्ष असून टाटा सन्समध्ये 66% समभाग असलेल्या या संस्थेचे टाटा सन्सवर पूर्ण नियंत्रण आहे. मिस्त्री यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय टाटा ट्रस्ट्‌सकडूनच घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

रतन टाटा यांच्यानंतर टाटा उद्योगसमुहाची धुरा सांभाळू शकणाऱ्या वारसदाराचा शोध घेणाऱ्या उच्चस्तरीय समितीस मिस्त्री यांच्या कल्पना अत्यंत प्रभावित करणाऱ्या वाटल्याने मिस्त्री यांची थेट टाटा उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. मात्र मिस्त्री यांनी प्रत्यक्ष हाती सूत्रे घेतल्यानंतर वेगळेच धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ, मानव संसाधन, तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांतील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या संचालकांना टाटा सन्सच्या बोर्डावर घेतले जावे, असा प्रस्ताव मिस्त्री यांनी आधी मांडला होता. परंतु, प्रत्यक्ष कामास सुरुवात केल्यानंतर मिस्त्री यांनी बाहेरील अधिकाऱ्यांनाच त्यांच्या कार्यकारी समितीमध्ये प्रवेश दिला. याशिवाय, मिस्त्री यांनी दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यात त्यांना आलेले अपयश, हेदेखील त्यांची हकालपट्टी होण्यामागील महत्त्वाचे कारण असल्याचे एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले आहे. 

एकंदरच, असमाधानकारक कामगिरी, संवेदनशील परिस्थितीची चुकीची हाताळणी, विभिन्न कार्य संस्कृतीचा संघर्ष, मूल्यांचा ऱ्हास आणि धोरणांमध्ये घेतलेला युटर्न, अशा विविध कारणांमुळे मिस्त्री यांना बाहेरचा दरवाजा दाखविण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, तडकाफडकी बाजूला करण्यात आल्याने धक्का बसलेल्या मिस्त्री यांनी हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. रतन टाटा यांनी मला अध्यक्ष म्हणून निष्क्रिय बनवून समूहात दोन सत्ता केंद्रे तयार केल्याचा आरोप मिस्त्री यांनी केला. यावर टाटा सन्सकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Web Title: cyrus mistry failed to deliver