दाभोलकर, पानसरे, लंकेश, कलबुर्गी हत्या एकाच गटाकडून ?

Dabholkar Pansare Lankesh Kalburgi killings from might be same group
Dabholkar Pansare Lankesh Kalburgi killings from might be same group

बंगळूर : चारही विचारवंतांच्या हत्या एकाच गटाकडून झाल्याबाबत तपास पथकांचे एकमत झाले आहे. मात्र, हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीबाबत तीन न्यायवैद्यकीय अहवालात दिलेल्या वेगवेगळ्या माहितीमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. न्यायवैद्यकीय तज्ज्ञांसमोर या गोंधळाचे निवारण करण्याचा निर्णय तपास संस्थांनी घेतला आहे. दरम्यान, गौरी लंकेश हत्येसाठी वापरण्यात आलेल्या आणखी एका दुचाकीचा एटीएसला पुण्यात शोध लागला आहे. 

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्या करण्यात आलेल्या ठिकाणी सापडलेल्या काडतुसांचे बंगळूर, गुजरात व मुंबई येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळांतून परीक्षण करण्यात आले. यासंबंधी बंगळूर व गुजरात न्यायवैधक प्रयोगशाळांनी सर्वसाधारणपणे समान अहवाल दिले आहेत. परंतु, मुंबई न्यायवैद्यक प्रयोगशाळेने वेगळा अहवाल दिला आहे. 

"सीआयडी'ने तीन हत्यांच्या ठिकाणी सापडलेली काडतुसे पुन्हा बंगळूर न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवून खात्री करून घेतली. तिन्ही ठिकाणी सापडलेल्या काडतुसांमध्ये समानता आहे. तीन ठिकाणी दोन बंदुकांचा वापर झाला असला, तरी एका बंदुकीचा दोन ठिकाणी वापर करण्यात आला असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

अमोल काळेने दिली बंदूक 

दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदूक गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटकेतील संशयिताने आणून दिल्याचे सीबीआयने मुंबई न्यायालयात सांगितले आहे. एसआयटीच्या तपासात बंदूक देणारी व्यक्ती अमोल काळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. काळेचे नाव चारही विचारवंतांच्या हत्येशी जोडलेले आहे. लंकेश यांची हत्या करण्यासाठी परशुराम वाघमारेला, कलबुर्गी यांची हत्या करण्यासाठी गणेश मिस्कीन याला काळेनेच पुण्यातून बंदूक आणून दिल्याची माहिती समोर आल्याचे तपास पथकाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुण्यात दुचाकीचा शोध 

लंकेश यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या आणखी एका दुचाकीचा पुण्यात शोध लागला आहे. दाभोलकर हत्या प्रकरणात एटीएसच्या ताब्यात असलेल्या शरद कळसकर याची पल्सर दुचाकी वापरण्यात आली होती, अशी माहिती त्याच्या तोंडूनच उघड झाली आहे. महाराष्ट्र एटीएसने कर्नाटकच्या एसआयटीला ही माहिती दिली. दुचाकी ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे अधिकारी पुण्याला गेल्याचे समजते. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली दुचाकीच लंकेश यांची हत्या करताना वापरण्यात आल्याचा सुगावा लागला आहे. 

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा हात असल्याचे अद्याप सिद्ध झाले नाही. तसे स्पष्ट झाल्यास संस्थेवर राज्यात बंदी घालण्यात येईल. देशाला अडचणीत आणणाऱ्या संघटनांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. विचारवंतांच्या हत्येत सनातनचा हात असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई करणे अनिवार्य आहे. 

- डॉ. जी. परमेश्वर, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com