'दलित पर्यटन' ही भाजपची परंपरा नाही ; 'यूपी'तील मंत्री सुरेश राणा यांचे वक्तव्य 

पीटीआय
शनिवार, 5 मे 2018

अलिगडच्या लोहगडमधील खेड्यात एका दलिताच्या घरी सहभोजन घेणारे उत्तर प्रदेशातील मंत्री सुरेश राणा यांचे बिंग माध्यमांनी फोडल्यानंतर त्यांनी आज सारवासारव करत कॉंग्रेसप्रमाणे "दलित पर्यटन' ही भाजपची परंपरा नसल्याचे म्हटले आहे.

लखनौ/नवी दिल्ली : अलिगडच्या लोहगडमधील खेड्यात एका दलिताच्या घरी सहभोजन घेणारे उत्तर प्रदेशातील मंत्री सुरेश राणा यांचे बिंग माध्यमांनी फोडल्यानंतर त्यांनी आज सारवासारव करत कॉंग्रेसप्रमाणे "दलित पर्यटन' ही भाजपची परंपरा नसल्याचे म्हटले आहे. माझ्यावर बाहेरून भोजन मागविल्याचा आरोप करणाऱ्या मंडळींनी तो सिद्ध करून दाखवावा. माझ्या भोजनातील सर्व पदार्थ हे खेड्यातील लोकांनीच तयार केले होते, असेही त्यांनी नमूद केले. 

स्थानिक आमदार अनुप वाल्मीकी आणि गावच्या सरपंचांनी या सहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार त्या दलित कुटुंबाच्या घरी मी नाश्‍ता करणार असे ठरले होते; पण मीच समाज केंद्रामध्ये त्यांच्यासोबत जेवण करण्याचा निर्णय घेतला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राणा यांनी भोजनासाठीचे पदार्थ, पिण्याचे पाणी आणि भांडी बाहेरून मागविली होती, असा दावा काही माध्यमांनी केला होता. या वेळी राणा यांनी कॉंग्रेसवरदेखील टीका केली, कॉंग्रेस नेत्यांप्रमाणे आम्ही पंचतारांकित हॉटेलांमध्ये राहात नाहीत, असे त्यांनी सांगितले. 

जैस्वाल यांची जीभ घसरली 

उत्तर प्रदेशच्या शिक्षणमंत्री अनुपमा जैस्वाल यांच्या वक्तव्यावरूनही आता नवा वाद निर्माण झाला आहे, गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, की ""पूर्वी दलितांच्या घरी जाणारे मंत्री आणि नेत्यांना रात्रभर डासांचा त्रास सहन करावा लागत होता; पण आता त्यांना त्यांच्या घरी गेल्याचे समाधान वाटते.

आता याच नेत्यांना दोन ठिकाणी जायला सांगितले तर ते आणखी चार ठिकाणी आम्ही जाऊ असे म्हणतात. यामुळे आमचे सक्षमीकरण झाले असून, मीही आता दलितांच्या घरांना भेटी देऊ लागले आहे.'' 

Web Title: Dalit tourism is not a tradition of BJP says Minister Suresh Rana