तमिळनाडूत अण्णा द्रमुकमध्ये "दंगल'

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

चेन्नई - अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला बुधवारी पक्षाच्या कार्यालयाबाहेर जोरदार हाणामारी झाली. पक्षाच्या सरचिटणीसपदासाठी नामांकन दाखल करण्यासाठी आलेले राज्यसभा सदस्य शशिकला पुष्पा यांचे पती लिंगेश्‍वरा थिलगन आणि त्यांच्या वकिलांना कार्यकर्त्यांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

चेन्नई - अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला बुधवारी पक्षाच्या कार्यालयाबाहेर जोरदार हाणामारी झाली. पक्षाच्या सरचिटणीसपदासाठी नामांकन दाखल करण्यासाठी आलेले राज्यसभा सदस्य शशिकला पुष्पा यांचे पती लिंगेश्‍वरा थिलगन आणि त्यांच्या वकिलांना कार्यकर्त्यांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

पक्षाची प्रतिमा मलीन केल्याच्या आरोपावरून शशिकला यांना पक्षाच्या अध्यक्ष दिवंगत जयललिता यांनी ऑगस्टमध्ये पक्षातून निलंबित केले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे शशिकला पुष्पा यांचे पती, वकील आणि समर्थकांना दुखापतीही झाल्या आहेत. पक्षाच्या सरचिटणीसाची निवड करण्यासाठी पक्षाची बैठक होणार होती. त्यापूर्वीच ही घटना घडली.

शशिकला आणि अन्य काही जण मुख्यालयात येणार असल्याच्या साशंकेतेने पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि माजी मंत्री दुपारी 1 वाजल्यापासून पक्षाच्या मुख्यालयाबाहेर एकत्र येण्यास सुरवात झाली. सुरक्षाही वाढविण्यात आली आणि लॉईड्‌स रोडच्या दोन्ही बाजूंना अडथळे उभारण्यात आले.

शशिकला यांचे पती आणि अन्य काही जण नामांकन अर्ज सादर करण्यासाठी मुख्यालयात प्रवेश करत असतानाच कार्यकर्त्यांचा बांध फुटला. तेथील अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याचे सांगत कागदपत्रे स्वीकारण्यास नकार दिला. शशिकला पुष्पा, त्यांचे पती आणि मुंबईहून आलेले पक्षाचे सदस्य के. एस. मनी यांना नामांकन अर्ज दाखल करायचा होता, असे एका सूत्राने सांगितले. तेवढ्यात कार्यकर्त्यांनी शशिकला यांचे पती आणि समर्थकांना मारहाण करायला सुरवात केली.
अण्णा द्रमुकचे प्रवक्ते अवदी कुमार म्हणाले, की पक्षाच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला जाणूनबुजून हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न झाला आहे.

चिनम्माच सरचिटणीस असतील : मंत्री
या घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना तमिळनाडू पालिका प्रशासन मंत्री एस. पी. वेलुमनी यांनी एका तमीळ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, की पक्ष नेतृत्वाचा दावा करण्याचा शशिकला पुष्पा यांना कोणताही अधिकार नाही. कोण आहेत त्या? त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. त्यांना अम्मांनी (जयललिता) यांनी निलंबित केले आहे. चिनम्मा (व्ही. के. शशिकला) याच पक्षाच्या सरचिटणीस असतील यात शंकाच नाही. पक्षातील लोकांची आणि पक्षाच्या दीड कोटी कार्यकर्त्यांची ही एकमुखी मागणी आहे.

 

Web Title: Dangal in Tamilnadu