‘नद्याजोड’चा मॉन्सूनवर परिणाम शक्य! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Danger of the Ken-Betwa project effect on monsoon environment By practitioners delhi

‘नद्याजोड’चा मॉन्सूनवर परिणाम शक्य!

नवी दिल्ली : पूर्वीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नद्याजोड प्रकल्पाचा पर्यावरणाप्रमाणेच मॉन्सूनच्या चक्रावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे.. या प्रकल्पामुळे जैवविविधता तर धोक्यात येईलच पण त्याचबरोबर नवे आर्थिक- सामाजिक प्रश्न निर्माण होतील, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. बुंदेलखंडमधील अवर्षण आणि दुष्काळ दूर करण्यासाठी केंद्राने केन-बेतवा प्रकल्पाला गती दिली असून यामाध्यमातून सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्याचाही सरकारचा विचार आहे. राष्ट्रीय नद्याजोड प्रकल्पाच्या अंतर्गत राबविण्यात येणारा पहिला प्रकल्प हा ‘केन- बेतवा’ असेल.

या प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील अवर्षणग्रस्त बुंदेलखंडमधील तब्बल अकरा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात येईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या भागामध्ये पुरामुळे अधिक पाणी येते ते पाणी अवर्षण आणि दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्यात येईल. या नद्याजोड प्रकल्पामुळे निसर्गाची साखळीच तुटू शकते त्यामुळे मॉन्सूनचे चक्र ठप्प होणार असून जैवविविधता धोक्यात तर येईलच पण त्याचबरोबर नवे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न देखील तयार होतील, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. ‘यमुना जिये’ या अभियानाचे समन्वयक मनोज मिश्रा म्हणाले की, ‘‘ यमुना नदीच्या संरक्षण आणि संवर्धानासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील, पूरप्रवण भागाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

नद्याजोड प्रकल्पाचे दुष्परिणाम हे फार उशिरा जाणवायला सुरूवात होतात त्याबाबत आताच अंदाज बांधता येत नाही. केन- बेतवाचेच उदाहरण घेता येईल, या दोन्ही नद्यांची उगमस्थाने वेगवेगळी आहेत. केन नदीमध्ये फार वेगळ्या प्रजातीचे औषधी मासे सापडतात पण ते बेतवामध्ये सापडत नाहीत. आता जर केन नदीचे पाणी बेतवाकडे वळविले तर जैवविविधतेचेही स्थलांतर होईल, या सगळ्या बदलांचा स्थानिक माशांच्या प्रजातीवर नेमका कसा परिणाम होईल, हे आपण आताच सांगू शकत नाही. याचा पर्जन्यमानावर देखील विपरीत परिणाम होईल. जेव्हा नद्यांचे पाणी वळविले जाते आणि ते समुद्रामध्ये मिसळते, तेव्हा त्याच्यासोबत गाळही जातो. या प्रकल्पाची निर्मिती करताना आपण फक्त मॉन्सूनची साखळी गृहीत धरली आहे पण त्याच्यावर काय परिणाम होतील हे मात्र आपल्याला ठावूक नाही.’’

शुद्ध पाण्याचा प्रवाह रोखला जाणार

समुद्रातील उष्णता आणि खारे पाणी (क्षार ) हे मॉन्सूनचे दोन महत्त्वाचे चालक असून नद्याजोड प्रकल्पांमुळे या दोन्ही घटकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्रात मिसळणारा ताज्या शुद्ध पाण्याचा प्रवाह आपण रोखत आहोत, त्यामुळे क्षारांचे प्रमाणही कमी होईल. या सगळ्याचा गंगेच्या पठरावर देखील विपरीत परिणाम होणार आहे, जे घटक मॉन्सूनच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत त्यांनाच आपण धक्का पोचवत आहोत, असे ‘साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’चे समन्वयक हिमांशू ठक्कर यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे सुमारे २३ लाख मोठी झाडे तोडण्यात येणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

नद्यांना परस्परांशी जोडून आपण त्यांना मारण्याचे काम करत आहोत. हे सगळे व्यावसायिक हेतू साध्य करण्यासाठी घडवून आणले जात आहे. वैश्विक तापमानवाढीमुळे नद्यांचे आधीच प्रवाह आटत चालले आहेत, नद्यांना जोडण्याचे काम करून आपण आणखी नव्या समस्यांना जन्म देत आहोत.

- मानसी असहर, संशोधक आणि अभ्यासिका

Web Title: Danger Of The Ken Betwa Project Effect On Monsoon Environment By Practitioners Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top