अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापरलं जाणारं डार्कनेट आहे तरी काय?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 17 August 2020

अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी डार्कनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या होत असलेल्या गैरवापरावर भारताप्रमाणेच ब्रिक्स संघटनेचे सदस्य असलेल्या अन्य देशांनी चिंता व्यक्त केली आहे

नवी दिल्ली, ता.१६ (पीटीआय)ः अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी डार्कनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या होत असलेल्या गैरवापरावर भारताप्रमाणेच ब्रिक्स संघटनेचे सदस्य असलेल्या अन्य देशांनी चिंता व्यक्त केली आहे. ब्रिक्सच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये भारताप्रमाणेच अन्य देशांनी सागरी मार्गाने होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर चर्चा करत त्यावर परस्पर सहकार्याने तोडगा काढण्याचा निर्धार बोलून दाखविला. 

ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थविरोधी कार्यसमुहाचे चौथे सत्र नुकतेच रशियाच्या अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट रोजी पार पडले. या सत्रामध्ये भारताच्यावतीने अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे संचालक राकेश अस्थाना सहभागी झाले होते. ब्रिक्स संघटनेमध्ये ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचा समावेश आहे. ब्रिक्स देशांमध्ये अंमली पदार्थांच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.

सध्या तस्करीच्या अनुषंगाने जगभर प्रचलित असलेल्या आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक प्रवाहांवर देखील या वेबिनारमध्ये गांभीर्याने चर्चा करण्यात आली तसेच याचा समाजावर होत असलेल्या परिणामांचा देखील मागोवा घेण्यात आला असे गृहमंत्रालयाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या निवेदनामध्ये सांगण्यात आले. या तस्करीसंबंधी माहितीचे आदानप्रदान तसेच समुद्र मार्गाने होणाऱ्या तस्करीला पायबंद आदी घटकांवर सदस्य देशांमध्ये मतैक्य झाले. 

स्वातंत्र्यानंतर प्रथमच संसदीय अधिवेशन अत्यंत वेगळ्या स्वरूपात
 

काय आहे डार्कनेट? 

डार्कनेट हा छुपा इंटरनेट प्लॅटफॉर्म असून या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री, पोर्नोग्राफीक माहितीचा प्रसार आणि अन्य बेकायदा कारवाया होतात. सध्या डार्कनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होत असलेला अंमली पदार्थांचा प्रसार तज्ञांच्या चिंतेचा विषय बनला आहे. मध्यंतरी अंमली पदार्थविरोधी विभागाने उत्तर प्रदेशातील तस्कराला अटक केली होती, त्याने डार्कनेटचा वापर करूनच परदेशातून अंमली पदार्थ मागविल्याची बाब उघड झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dark net used for narcotics trafficking Concern for BRICS