माहितीला आता तेलाएवढे महत्त्व: अंबानी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

चौथ्या औद्योगिक क्रांतीचा पाया डेटावर आधारलेला आहे. माहिती हा नैसर्गिक स्रोत आहे आणि माहिती गोळा करण्यासाठी अनेक लोकांची आवश्यकता आहे

नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आजच्या डिजिटल युगात माहितीचे(डेटा) महत्त्व विशद करीत डेटा म्हणजे 'नवे तेल' असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील नॅसकॉम परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. 

"चौथ्या औद्योगिक क्रांतीचा पाया डेटावर आधारलेला आहे. संपर्क आणि माहितीमुळे सर्व प्रकारचे विज्ञान एकाच मंचावर आणता येणे शक्य झाले आहे. माहिती हा नैसर्गिक स्रोत आहे आणि माहिती गोळा करण्यासाठी अनेक लोकांची आवश्यकता आहे. याबाबतीत 1.2 अब्ज लोकसंख्येचा भारताला विशेष लाभ मिळू शकतो," असे अंबानी म्हणाले. 

"आपण आज अशा युगात प्रवेश करीत आहोत जेथे माहितीला तेलाएवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या देशात दर्जा, संख्या आणि किफायतशीरतेच्या परिमाणांबाबत याची कमतरता नसावी. आपल्या देशातील तरुण लोकसंख्या आणि त्यांच्या हुशारीचा आपल्याला स्पर्धात्मक लाभ मिळू शकतो, असेही ते म्हणाले.  

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारतातील कुशल कर्मचाऱ्यांना स्थानिक तंत्रज्ञान क्षेत्राच्या समस्या सोडविण्याची संधी मिळेल असे म्हणत "ट्रम्प हे भारतीय माहिती व तंत्रज्ञान(आयटी) क्षेत्रासाठी इष्टापत्ती ठरु शकतात,'' असे प्रतिपादन अंबानी यांनी केले.  

डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणांमुळे जगभरातील उद्योगांसाठी दोलायमान स्थिती केली आहे. हे वास्तव स्वीकारून भारतीय आयटी कंपन्यांनी यातून संधी शोधली पाहिजे, असे मत अंबानी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, "स्थानिक समस्यांमधून मार्ग काढल्यास भारतीय कंपन्यांसाठी प्रचंड संधी आहे. जागतिक घडामोडींना महत्त्व न देता भारतीय कंपन्यांनी देशांतर्गत संधीवर भर दिला पाहिजे. भारताची डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. डिजिटल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी असून, त्याचा फायदा स्थानिक कंपन्यांनी घ्यावा.''

  

Web Title: data is is the new oil, says mukesh ambani