दाऊदसह लादेनचा मुलगा हमजा आंतरराष्ट्रीय दहशतवादी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मे 2019

- हमजा बिन लादेन हा ओसामा बिन लादेनचा मुलगा.

- त्याला पकडण्यासाठी ठेवण्यात आले 7 कोटींचे बक्षीस.

नवी दिल्ली : जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरच्या अगोदर सहा जणांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. घातपाती कारवाया करणे, स्फोट घडवून आणणे, अमली पदार्थाची तस्करी, हल्ले घडवणे यासंदर्भात पुरावे सिद्ध झाल्याने संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. 

जकी ऊर रेहमान लखवी : लष्करे तैयबाचा कमांडर जकी ऊर रेहमान लखवीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेला लखवी युवकांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याचे काम करतो. त्याला पाकिस्तानचे सैन्य आणि आयएसआय संघटनेचे संरक्षण दिले आहे. 

अयमान अल जवाहिरी : ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल जवाहिरी हा अल कायदा या दहशतवादी संघटनेचा नेता बनला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवर त्याचे वास्तव्य असून, त्याच्यावर इजिप्तमध्ये 62 पर्यटकांची हत्या केल्याचा आरोप आहे.

हमजा बिन लादेन : हमजा बिन लादेन हा ओसामा बिन लादेनचा मुलगा. त्याला पकडण्यासाठी 7 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. वडिलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेसह अन्य देशांवर हल्ले करण्याची धमकी हमजाने दिलेली आहे. 
दाऊद इब्राहिम : 1993 च्या मुंबई साखळी स्फोटाचा मुख्य सूत्रधार, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. आंतराष्ट्रीय माफिया डॉन म्हणून त्याची ओळख. तो कराचीच्या क्‍लिफ्टन रोडवर राहत असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानसह अनेक आशियाई देशातील बेकायदा कामात त्याचा सहभाग आहे. 

सय्यद सलाउद्दीन : हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचा म्होरक्‍या सय्यद सलाउद्दीन हा पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये राहत असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानी सैनिक आणि आयएसआयच्या संरक्षणाखाली त्याचा वावर. भारतातील अनेक घातपाती कारवायात त्याचा सहभाग आहे.

हाफिज सईद : लष्करे तैयबा, जमात उद दावाचा म्होरक्‍या हाफिज सईद याने भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. भारताविरुद्ध प्रक्षोभक भाषण देऊन युवकांना भडकावण्याचे काम हाफिज सईद करतो. लाहोरच्या जोहर टाऊनमध्ये राहत असल्याचे सांगितले जाते. त्याला पाकिस्तानी सैनिकांनी संरक्षण दिले आहे. त्यालाही आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याच्यावर 70 कोटींचे इनाम ठेवण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dawood Hamza are International Terrorist