आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे...

dd assistant cameraman recorded video viral a message for his mother at chhattisgarh naxal attack
dd assistant cameraman recorded video viral a message for his mother at chhattisgarh naxal attack

रायपूर : छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मंगळवारी (ता. 30) केलेल्या बेछूट गोळीबारात दोन पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले, तर दूरदर्शन वाहिनीचा छायाचित्रकाराचाही मृत्यू झाला. सुदैवाने दूरदर्शनचा कॅमेरा असिस्टंट या हल्ल्यातून सुदैवाने बचावला असून, त्यांनी हल्ल्यावेळी केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दूरदर्शनचा कॅमेरा असिस्टंट मोरमुक्त या हल्ल्यातून सुदैवाने बचावले आहेत. हल्ला सुरु असताना कदाचित आपलाही मृत्यू होईल, अशी शक्यता वाटत असल्याने त्यांनी आपल्या आईसाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन ठेवला होता. या व्हिडीओमध्ये मोरमुक्त आपलं आईवरील प्रेम व्यक्त करताना दिसत असून, कदाचित आपण वाचणार नाही असे म्हणत आहेत. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

व्हिडीओत मोरमुक्त बोलताना दिसत आहे की, 'आम्ही एका रस्त्याने जात होतो. अचानक नक्षलवाद्यांनी आम्हाला घेरले. आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कदाचित या हल्ल्यात मी मारला जाईन. परिस्थिती चांगली नाहीये. का माहित नाही पण मृत्यू समोर दिसूनही भीती वाटत नाहीये. वाचणं कठीण आहे. सहा ते सात जवान सोबत आहेत. चारही बाजूंनी घेरलं आहे.' दरम्यान, मोरमुक्त बोलत असताना गोळीबाराचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहेत.

दंतेवाडामधील निलावय गावात ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी हल्ला केला त्या वेळी "डीडी' न्यूजचे पत्रकार आणि छायाचित्रकार एका गाडीतून जात होते. त्यातील छायाचित्रकार अच्युतानंद साहू यांचा गोळीबारात मृत्यू झाला. साहू हे मूळ ओडिशातील होते. भारतीय लष्करातून निवृत्त झाल्यानंतर साहू हे दूरदर्शनसाठी काम करत होते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे वार्तांकन करण्यासाठी हे पथक येथे आले होते. नक्षलवाद्यांच्या गोळीबारात पोलिस उपनिरीक्षक रुद्रप्रताप आणि सहायक फौजदार मंगलू हे हुतात्मा झाले, तर दोन पोलिस जखमी झाले. या घटनेनंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम सुरू केली. साहू आणि जवानांच्या मृत्यूबाबत प्रसार भारतीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

छत्तीसगडमध्ये 12 अणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे. नक्षलवाद्यांनी रविवारी (ता. 28) केलेल्या हल्ल्यातही बिजापूर जिल्ह्यात सीआरपीएफचे चार जवान हुतात्मा झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com