
Nitin Gadkari : नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिस सतर्क
नवी दिल्लीः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. मागच्याच महिन्यात त्यांना धमकी आली होती. आता पुन्हा दिल्लीतल्या निवासस्थानी धमकी मिळाली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काल संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. गडकरींच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली आणि आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 'एएनआय'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
दिल्ली पोलिसांचे म्हणण्यानुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या फोनची माहिती त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची पडताळणी केली जात असून, तपास सुरू आहे.
मागे त्यांना दिलेल्या धमकीनंतर नागपूर पोलिसांनी मंगळूरू येथील रजिया नावाच्या तरुणीला ताब्यात घेतले होते. तसेच गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा फोन आणि रजियाला करण्यात आलेला फोन हे दोन्ही फोन कॉल बेळगावच्या तुरुंगामधूनच झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली होती.