दरड कोसळून तीन भाविकांचा मृत्यू 

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

बालतल मार्गावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला तर अन्य एकाचा हदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यामुळे अमरनाथ यात्रेदरम्यान मृत्युमुखी पडणाऱ्या भाविकांची संख्या दहावर पोचली आहे. 

श्रीनगर: बालतल मार्गावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला तर अन्य एकाचा हदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यामुळे अमरनाथ यात्रेदरम्यान मृत्युमुखी पडणाऱ्या भाविकांची संख्या दहावर पोचली आहे. 

पावसामुळे अमरनाथ यात्रेच्या बालतल मार्गावर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. आज सकाळी बालतल मार्गावर दरड बाजू करणाऱ्या पथकाला शैलेंद्र (वय 30) यांचा मृतदेह आढळून आला. याशिवाय ज्योती शर्मा (वय 35) आणि अशोक महातो (वय 51) यांचाही मृतदेह काल रात्री सापडला. शर्मा या दिल्लीच्या तर अशोक हे बिहारचे रहिवासी होत. याशिवाय पाच जण जखमी झाले असून त्यात दोन भाविकांचा समावेश आहे. काल जम्मू काश्‍मीर पोलिसांनी दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. मात्र आज सकाळी तीनच भाविकांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच गुजरातच्या नानीबेन पर्मा (वय 60) यांचा हृदयविकाराच्या झटक्‍याने पंजतर्णी येथील छावणीत मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बालतल छावणीत नेल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने अमरनाथ यात्रेदरम्यान मृतांची संख्या दहावर पोचली आहे. 

भाविकांचा सातवा जत्था रवाना 
संततधार पावसात अमरनाथ यात्रेसाठी 3708 भाविकांचा सातवा जत्था जम्मूहून आज सकाळी रवाना झाला. भगवतीनगर येथील छावणीतून पहाटे अडीचच्या सुमारास 114 वाहनांतून भाविक रवाना झाले. त्यात 622 महिला आणि 232 साधूंचा समावेश आहे. काल 18,476 भाविकांनी अमरनाथांचे दर्शन घेतले. 28 जूनपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेत आतापर्यंत 54 हजार 833 भाविकांनी दर्शन घेतले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील 36 किलोमीटर लांबीच्या पहेलगाम मार्ग आणि गंदरबल येथे 12 किलोमीटरच्या बालतल मार्गाने रवाना झाले आहेत. जम्मूहून एकूण 23,718 भाविक रवाना झाले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे काश्‍मीर खोऱ्यात पुराचे सावट असतानाही काही तास उशिरा का होईना 28 जून रोजी निश्‍चित वेळेवर अमरनाथची यात्रा सुरू झाली.

Web Title: Death of three devotees due to rift collapses