भगवा ध्वज लावण्यावरून बेळगावमधील बस्तवाडमध्ये वादावादी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

बेळगाव - महालक्ष्मी देवीच्या गदगेच्या शामियान्यावर भगवा ध्वज लावण्यावरून बस्तवाडमध्ये (ता. बेळगाव) बुधवारी (ता. ८) वादावादी व दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त यशोदा वंटगुडी यांच्या नेतृत्वाखाली गावात दाखल झालेल्या पोलिसांनी लाठीमार करून स्थिती नियंत्रणात आणली. 

बेळगाव - महालक्ष्मी देवीच्या गदगेच्या शामियान्यावर भगवा ध्वज लावण्यावरून बस्तवाडमध्ये (ता. बेळगाव) बुधवारी (ता. ८) वादावादी व दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त यशोदा वंटगुडी यांच्या नेतृत्वाखाली गावात दाखल झालेल्या पोलिसांनी लाठीमार करून स्थिती नियंत्रणात आणली. 

बस्तवाडची ग्रामदेवता असलेल्या महालक्ष्मी देवीची यात्रा १४ वर्षांनंतर होत आहे. यात्रेला मंगळवारपासून (ता. ७) प्रारंभ झाला असून ती बुधवारपर्यंत (ता. १५) चालणार आहे. मंगळवारी देवीचा विवाह सोहळा झाला. बुधवारी सकाळी दहापासून देवीची रथातून मिरवणूक काढण्यास सुरवात झाली. या सोहळ्यात गावातील सर्व समाजाचे लोक सहभागी झाले होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास रथ महालक्ष्मी मंदिराजवळील गदगेजवळ पोचला. तेथे शामियाना उभारण्यात आला आहे.

महालक्ष्मी यात्रेत गदगेच्या शामियान्यावर भगवा ध्वज लावण्याची परंपरा आहे. त्यानुसार शामियान्यावर भगवा ध्वज लावण्याचा निर्णय काहींनी घेतला. त्याला गावातील एका गटाच्या तरुणांनी विरोध केला. ध्वज लावण्यासाठी एक तरुण शामियान्यावर चढला असता त्याला आणखी एका तरुणाने खाली खेचले. त्याच्याकडील ध्वज काढून घेतला. ध्वजाचा अवमान झाल्यामुळे संतप्त तरुणांनी त्याचा जाब विचारण्यास सुरुवात केल्याने त्यातून वादाला तोंड फुटले. दोन गटांत शािब्दक चकमक सुरू असतानाच अचानक दगडफेक सुरू झाली. त्यामुळे वाद वाढून तणाव निर्माण झाला. 

घटना घडली त्यावेळी मिरवणुकीत हजारो ग्रामस्थ व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. यात्रेसाठी आलेल्या व्यावसायिकांनीही तेथेच दुकाने थाटली होती. वाद व दगडफेक सुरू झाल्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मिरवणुकीत सहभागी झालेले ग्रामस्थ, नातेवाईक व व्यापाऱ्यांची पळापळ सुरू झाली.

यात्रा समितीचे पदाधिकारी व पंचांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण, दगडफेक लवकर थांबली नाही. पोलिसच दगडफेकीत जखमी झाल्यामुळे यात्रा समिती व पंचही काहीवेळ हतबल झाले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्‍त फौजफाटा गावात पोचला. त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरापर्यंत गावात तणावाची स्थिती कायम होती. गावाला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. 

मूर्ती प्रतिष्ठापनेलाही विलंब
वाद संपेपर्यंत लक्ष्मीची मूर्ती रथातच होती. मूर्तीची गदगेवर प्रतिष्ठापना करण्याची प्रक्रियाही लांबणीवर पडली. यात्रा समिती व गावातील सर्व समाजाच्या प्रमुखांनी एकत्र येऊन लक्ष्मी मूर्तीची मिरवणूक पूर्ण केली. त्यानंतर मूर्तीची गदगेवर प्रतिष्ठापना झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: debate on Saffron flag in Bastwad Belgaum