स्मृती इराणींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास विजेत्यांचा नकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यातच कलाकारांचा सन्मान असतो, त्यामुळे राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार घेण्यावर सर्व विजेते ठाम आहेत. असे न झाल्यास आम्ही पुरस्कार घेणार नाही व सोहळ्यास अनुपस्थित राहू असे विजेत्यांनी पत्रात सांगितले आहे.

नवी दिल्ली : 65 वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा आज (ता. 3) नवी दिल्लीतील विज्ञान भवनात सायंकाळी चार वाजता पार पडेल. पण या पुरस्कार सोहळ्याबाबत आता नवीनच वादाला सुरवात झाली आहे. हे पुरस्कार स्मृती इराणींच्या हस्ते स्विकारणार नाही, अशी ठाम भूमिका कलाकारांनी घेतली आहे. 

दरवर्षी हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. पण यावर्षी यात बदल करत, यातील काही पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद व उर्वरित पुरस्कारांचे वितरण केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते केले जाईल. हा निर्णय यावर्षी नव्याने घेतला गेल्यामुळे पुरस्कारार्थींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 

 national film awards

वेळेअभावी राष्ट्रपती केवळ अकराच पुरस्कार प्रदान करतील. बाकीचे पुरस्कार हे स्मृती इराणींच्या हस्ते दिले जातील. पण पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार हवे असल्याने त्यांनी तशी मागणी सरकारकडे केली आहे व सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. 

या पुरस्कार विजेत्यांनी तशा मागणीचे पत्र सरकारला सादर केले आहे. या पत्रात साधारण 60 विजेत्यांच्या सह्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यातच कलाकारांचा सन्मान असतो, त्यामुळे राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार घेण्यावर सर्व विजेते ठाम आहेत. असे न झाल्यास आम्ही पुरस्कार घेणार नाही व सोहळ्यास अनुपस्थित राहू असे विजेत्यांनी पत्रात सांगितले आहे. हे विजेते विविध राज्यातून आलेले असतात, त्यामुळे सरकारने यथायोग्य प्रकारे सन्मानित करावे अशी कलाकारांची मागणी आहे. 

मराठी पुरस्कार विजेते नागराज मंजुळे यांनी इतक्या वर्षांची परंपरा का बदलली असा सवाल केला आहे. 

Web Title: decline to receive national film awards from smriti irani said by award winners