कर्नाटकात इंधन दोन रुपयांनी स्वस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

बंगळूर - इंधन दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्राहकांवरील भार कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी निर्णय घेतला आहे. पेट्रोल व डिझेलवरील कर सव्वा तीन टक्‍क्‍यांनी कमी करण्याची घोषणा त्यांनी सोमवारी (ता. १७) गुलबर्ग्यात केली.

बंगळूर - इंधन दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्राहकांवरील भार कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी निर्णय घेतला आहे. पेट्रोल व डिझेलवरील कर सव्वा तीन टक्‍क्‍यांनी कमी करण्याची घोषणा त्यांनी सोमवारी (ता. १७) गुलबर्ग्यात केली. त्यामुळे, इंधन दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. नवीन दर मंगळवारपासून (ता. १८) लागू होणार आहेत.

देशभरात पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने जनतेत असंतोष आहे. दर कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर इंधनावरील सेस कमी करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. राज्यात सध्या पेट्रोलवरील ३२ टक्‍के व डिझेलवरील २१ टक्के विक्रीकर आकारला जातो. त्यात अनुक्रमे ३.२५ व ३.२७ टक्के कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे, पेट्रोलवरील विक्रीकर आता २८.७५ व डिझेलवरील विक्रीकर १७.७३ टक्के होणार आहे. त्यामुळे, इंधन दरात २ रुपयांनी कपात होणार आहे.

देशभरात इंधन वाढत असताना कर्नाटकात दर दोन रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्यामुळे लोकांत समाधान व्यक्‍त होत आहे. दर वाढत असल्यामुळे पेट्रोल शंभरी पार करेल, अशी भिती सामान्यांतून व्यक्‍त होती. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा करत असताना इंधनावर अतिरिक्‍त कर लादण्यात आला होता. त्यामुळे इंधन दरात वाढ झाली होती.

या प्रकारामुळे वाहनधारकांत नाराजी होती. शिवाय या दरवाढीमुळे अन्नधान्याच्या महागाईतही वाढ झाली होती. लोकांचा वाढता रोष पाहून कुमारस्वामी यांनी चार दिवसांपूर्वीच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पेट्रोल, डिझेल दर कपात करण्याचा निर्णय घेतला होता. आता तो मंगळवारपासून लागू होणार आहे. 

पेट्रोल, डिझेलचे दर रोज वाढत असल्यामुळे सामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. महागाई वाढत आहे. अशा काळात सरकारने दोन रूपये जरी कमी केले तरी, तितके समाधान आहे. पण, त्यानंतरही दर वाढतच राहिल्यास सामान्यांचे महिन्याचे बजट कोलमडणार आहे.
-अंकुश पाटील,
वाहनधारक

एकीकडे इंधनाचे दर वाढल्यामुळे आपली वाहने बाहेर काढताना विचार करावा लागतोय. त्यात बस वाहतूकही महागली असल्यामुळे खिशावर अधिकच भार पडतोय. सरकारने किमान दहा ते पंधरा रूपये दर कमी करणे अपेक्षित आहे.
-अमृत बोकमूरकर,
वाहनधारक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decrease in Petrol Diesel Prices in Karnataka