गोव्यात मगोच्या सिंहाने उगारला पंजा

गोव्यात मगोच्या सिंहाने उगारला पंजा

पणजी - सरकारचे नेतृत्व कोणी करावे याचा निर्णय भाजप घेऊ शकत नसतानाच सरकारमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगो) अखेर पंजा उगारला आहे. मांद्रे व शिरोडा पोट निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याबाबत  १५ नोव्हेंबरपर्यंत मगो निर्णय घेईल, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले आहे. यामुळे घाईघाईने भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना मगोच्या नेत्यांशी बोलणी करून दोन्ही ठिकाणी उमेदवार उभा करू नये यासाठी त्यांचे मन वळवू असे सांगावे लागले आहे.

सरकारमधील नेतृत्वावर कायम तोडगा काढावा ही गोवा फॉरवर्ड या सरकारमधील एका घटक पक्षाची मागणी आहे तर दुसरा घटक पक्ष ज्येष्ठ मंत्र्याकडे ताबा द्यावा असे म्हणत आहे. मध्यंतरी नेतृत्व बदलाचा विषय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फारच गांभीर्याने घेतला होता. त्यांनी काही बैठकाही घेतल्या. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी भाजप नेतृत्व बदलाच्या विषयावर गांभीर्याने विचार करत आहे आणि आम्ही कायमस्वरुपी तोडग्याची मागणी केली आहे असे सांगितले होते. मात्र यावेळी मगोने थोडे दिवस था्ंबा असे धोरण अवलंबले होते.

आता मगोने राजकीय खेळीला सुरवात केली आहे. मगोचे नेते सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून आले. वाहतूकीच्या प्रश्नासंदर्भात ही भेट होती असे ढवऴीकर यांनी सांगितले असले तरी सध्याच्या परिस्थितीत राजकीय चर्चा अपरीहार्य आहे हे काही वेगळे सांगावे लागत नाही. त्याचमुळे या भेटीनंतर गडकरी यांनी म्हादई प्रश्नी गोव्याची बाजू मांडण्यासाठी अतिरीक्त सॉलीसीटर जनरल अॅड आत्माराम नाडकर्णी यांना दिलेली परवानगी केंद्रीय जलसंपदामंत्री या नात्याने मागे घेतली. यासाठी तांत्रिक कारण पुढे केले गेले असले तरी आजवर ते कारण केंद्र सरकारला का आठवले नाही आताच तो निर्णय घेण्याचे कारण कोणते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दक्षिण गोव्याचे खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांनी केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा असे विनंतीपत्र पाठवले असले तरी या निर्णयाचा राजकीय अर्थ काढायचा तो काढला गेला आहे.

युतीत नाही, आघाडीत आहोत
मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी बऱ्याच दिवसांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, आम्ही भाजपसोबत युतीत नव्हतो. 2017 मधील विधानसभा निवडणूक आम्ही भाजपसह इतर पक्षांच्या विरोधात लढवली होती. भाजप नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही आम्ही नाही. त्यामुळे. भाजपच्या उमेदवाराविरोधात उमेदवार उभा न करण्याचे बंधन आमच्यावर नाही. आम्ही भाजप आघाडीच्या सरकारमध्ये आहोत. मांद्रे व शिरोडा हे मगोचे परंपरागत मतदारसंघ आहेत. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हे मांद्रे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते हे कसे विसरता येईल. या दोन्ही मतदारसंघात पक्षाची संधटनात्मक बांधणी आहे. त्यामुळे आम्ही या दोन्ही पोट निवडणुकांत उमेदवार उतरविणे हे नैसर्गिक आहे. उमेदवार कोण याचा निर्णय आम्ही 15 नोव्हेंबरपर्यंत घेऊ. मगोचे उमेदवार या दोन्ही मतदारसंघात जिंकण्याने सरकारच मजबूत होणार आहे कारण आम्ही आघाडीत आहोत. लोकसभा निवडणूकही स्वतंत्रपणे लढविण्याविषयी आम्ही यापूर्वीच सांगितले आहे. सध्या प्रशासन कोलमडल्याने लोकांचे कामे होत नाहीत. भाजपने याकडे येत्या दीड महिन्यात लक्ष द्यावे, तूर्त वरिष्ठ मंत्र्या्ंकडे कारभार सोपवावा अशी आमची मागणी कायम आहे. भाजपने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल तो काय असेल तो योग्य वेळीच आम्ही जाहीर करू.

भाजपची तयारी सुरु
भाजपने काल राज्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत लोकसभा निवडणूक तयारीची सुरवात केली. काल त्यांनी दक्षिण गोव्यातील मंडळ अध्यक्ष आणि मतदारसंघ प्रभारी यांची मडगावात बैठकही घेतली. आज पणजीत उत्तर गोव्यातील मंडळ अध्यक्ष व मतदारसंघ प्रभारी यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सध्याच्या राजकारणावर विशेषतः माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलेल्या टीकेबाबत प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तरपणे माहिती दिली. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका करण्याचा अधिकार कोणालाच नाही असा सूर या बैठकीत उमटला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव विजय पुराणिक, भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सुलक्षणा सावंत अादी बैठकीत सहभागी झाल्या. वीजमंत्री निलेश काब्राल यांनी खाणी सुरु न झाल्यास लोकसभा निवडणुकींवर होणाऱ्या संभाव्य परीणामांची माहिती या बैठकीत दिल्याची माहिती मिळाली. आहे.

भाजपकडून मगोची मनधरणी
मांद्रे व शिरोडा मतदारसंघातील पोट निवडणुकीत मगोने आपले उमेदवार उभे करू नयेत यासाठी भाजपचे नेते मगोच्या नेत्यांकडे बोलणी करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सांगितले, की आघाडीत मगो, गोवा फॉरवर्ड व अपक्ष आहेत. त्यांनी सरकारमध्ये असेपर्यंत एकमेकाविरोधात लढू नये हा आघाडीचे धर्म आहे. त्यामुळे मगोच्या नेत्यांशी आम्ही बोलणी करणार आहोत. त्यांनी पोट निवडणुकीत आपले उमेदवार उभे करू नयेत. त्यासाठी मगोच्या नेत्यांचे आम्ही मन वळवू. भाजप उमेदवाराआड मगोचे उमेदवार नसतील असा विश्वास आहे. मगोच्या अध्यक्षांनी प्रशासन कोलमडल्याचे म्हटले आहे, प्रशासन गतिमान करण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दिवाळीच्या दरम्यान पून्हा पूर्ण क्षमतेने काम करु लागतील. त्यामुळे तोवर मगोच्या नेतृत्वाने संयम ठेवावा. मुख्यमंत्रीच कार्यालयात येणार असल्याने वरिष्ठ मंत्र्याकडे कारभार सोपवण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com