लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणातील आरोपी दीप सिद्धू अखेर 14 दिवसांनी अटकेत

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 9 February 2021

२६ जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

नवी दिल्ली- २६ जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या दिवशी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर्स निर्धारित मार्ग सोडून दिल्लीतील लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले होते. यावेळी अनेक आंदोलकांनी धुसघूस घातला होता. ट्र्रक्टर रॅलीतील हिंसाचाराप्रकरणी पंजाबी कलाकार दीप सिद्धूवर गंभीर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी आरोप ठेवल्यानंतर दीप सिद्धू फरार झाला होता. अखेर १४ दिवसांनी दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावरील घुमुटावर झेंडा फडकवल्याचा आरोप असलेला अभिनेता दीप सिद्धू फरार होता. याचदरम्यान दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठ्याप्रमाणात हिंसाचार झाला होता. आंदोलकांनी लाल किल्ल्याच्या घुमुटावर जाऊन निशाण साहिबचा झेंडा फडकवला होता. 

26 जानेवारी 2021 रोजी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झेंडा फडकवल्याप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचे नाव समोर आले होते. चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी तसेच उपद्रव माजवल्याप्रकरणी पोलिसांनी दीप सिद्धूविरोधात एफआयआर दाखल केला होता. 

केजरीवालांची लेक ऑनलाइनच्या भानगडीत फसली; दणक्यात गमावले 34 हजार

नोव्हेंबर महिन्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दीप सिद्धू पंजाब व्यतिरिक्त देशभरात पोहोचला होता. या व्हिडिओत सिद्धू हा सिंघू सीमेवर शेतकऱ्यांबरोबर उभा होता. यावेळी तो एका पोलिस अधिकाऱ्याशी इंग्रजीत बोलताना दिसला होता. सुरुवातीला इंग्रजीत बोलणारा शेतकरी म्हणून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर तो पंजाबी चित्रपटातील अभिनेता असल्याचे सर्वांना समजले. त्याने अनेक चित्रपटांत कामे केली आहेत. 

भाजपशी जोडले गेले नाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप खासदार तथा अभिनेता सनी देओल यांच्याबरोबरील दीप सिद्धूचे फोटो व्हायरल झाले होते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी सिद्धूने हे कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला. सिद्धूने 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत सनी देओलसाठी गुरुदासपूर येथे प्रचार केला होता. दरम्यान, सनी देओल यांनी दीप सिद्धूचा आणि आपला काही संबंध नसल्याचा खुलासा केला होता.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deep Sidhu accused 26th January violence case arrested Delhi Police Special Cell