सरकार स्थापनेनंतर लगेचच कर्जमाफी :राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 12 डिसेंबर 2018

ईव्हीएमचा मुद्दा संपलेला नाही
कॉंग्रेसचा विजय झाला असला, तरी ईव्हीएमचा मुद्दा अजून संपला नसल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले. जनतेमध्ये याबाबत अस्वस्थता असून, यावर तोडगा काढावा लागेल. इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणा असून त्यातील चिपमध्ये फेरफार केली, तर निकालांवर परिणाम करता येतो, असे सांगितले जात आहे. मतपत्रिकेद्वारे मतदान झाल्यास अशी फेरफार शक्‍य नाही. अमेरिकेमध्येही याच मुद्‌द्‌यावरून ईव्हीएम नाकारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या लोकसभा निवडणुकीने आपल्याला बरेच काही शिकवले, असे सांगताना काय करू नये, हे मोदींकडून शिकायला मिळाले, असा चिमटाही राहुल गांधींनी काढला.

नवी दिल्ली : छत्तीसगड, राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली. विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या राहुल यांनी "पंतप्रधान मोदी आणि भाजपमुळे देश समाधानी नाही' हे या निकालांतून स्पष्ट झाल्याचा टोला लगावला; तसेच 2019 मध्येही मोदींना पराभूत करण्याचा आत्मविश्‍वासही बोलून दाखवला.

विधानसभा निवडणुकांचे चित्र सायंकाळी उशिरा स्पष्ट झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रसार माध्यमांसमोर येऊन निकालांवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले. पक्षाच्या विजयाचा आनंद राहुल यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. छत्तीसगड, राजस्थानमधील विजयाबद्दल जनतेला आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा देताना मध्य प्रदेशातही कॉंग्रेसचे सरकार स्थापन होईल; तसेच या राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून पक्षात फारशी अडचण येणार नाही. सारे काही सुरळीत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तेलंगण आणि मिझोरममधील पराभवाबद्दल राहुल यांनी खंत व्यक्त केली.

कॉंग्रेसला मिळालेला विजय हा कार्यकर्त्यांचा, तरुणाईचा, शेतकऱ्यांचा आणि लहान व्यापाऱ्यांचा असून, त्यांचा आवाज ऐकण्याची आणि त्यानुसार काम करण्याची जबाबदारी कॉंग्रेसवर आहे, असे सांगत राहुल गांधींनी मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमधील भाजपच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचे जनतेसाठी काम केल्याबद्दल आभारही मानले. तसेच पक्षकार्यकर्त्यांना "बब्बर शेर' म्हणून विजयाचे श्रेय दिले. कॉंग्रेसचे सरकार स्थापन होताच या राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल, असेही त्यांनी जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले, की पंतप्रधान आणि भाजपमुळे देश समाधानी नाही, हा या निकालांतून स्पष्ट संदेश मिळाला आहे. जनता बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटीमुळे दुःखी असून रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, अर्थव्यवस्था सुधारण्याची आश्‍वासने पंतप्रधानांनी पूर्ण केली नसल्याने जनतेमध्ये भवितव्याबद्दल अनिश्‍चितता आहे. कॉंग्रेसच्या सरकारांना या दिशेने काम करावे लागणार आहे.

पुढील लोकसभा निवडणुकीत मोदींना पराभूत करणार, असा दावा करताना राहुल म्हणाले, ""मोदी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत, अशी जनतेमध्ये खरोखर भावना होती; पण आता जनतेल्या मनात ठसले आहे की पंतप्रधान स्वतःच भ्रष्ट आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसच्या विजयाचे हेदेखील कारण आहे.'' या वेळी राहुल गांधींनी राफेल प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला.

राहुल गांधींनी विरोधी पक्षांमध्ये एकजूट असल्याचा दाखला दिला. सर्वपक्षीय बैठकीतून हे ऐक्‍य स्पष्ट दिसते, असे सांगताना राहुल गांधींनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि कॉंग्रेसची विचारसरणी एकच असल्याची विधान केले. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये या पक्षांशी आघाडीची चर्चा होऊनही गणित न जुळल्याने आघाडी टळल्याची कबुली दिली.

ईव्हीएमचा मुद्दा संपलेला नाही
कॉंग्रेसचा विजय झाला असला, तरी ईव्हीएमचा मुद्दा अजून संपला नसल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले. जनतेमध्ये याबाबत अस्वस्थता असून, यावर तोडगा काढावा लागेल. इलेक्‍ट्रॉनिक यंत्रणा असून त्यातील चिपमध्ये फेरफार केली, तर निकालांवर परिणाम करता येतो, असे सांगितले जात आहे. मतपत्रिकेद्वारे मतदान झाल्यास अशी फेरफार शक्‍य नाही. अमेरिकेमध्येही याच मुद्‌द्‌यावरून ईव्हीएम नाकारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या लोकसभा निवडणुकीने आपल्याला बरेच काही शिकवले, असे सांगताना काय करू नये, हे मोदींकडून शिकायला मिळाले, असा चिमटाही राहुल गांधींनी काढला.

कॉंग्रेसचे हे यश पक्ष कार्यकर्ते, युवक, शेतकरी, छोटे दुकानदार यांचे आहे. रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांच्या समस्येबाबत पंतप्रधान मोदींनी दिलेली आश्‍वासने फोल आहेत, हे जनतेच्या लक्षात आल्यानेच भाजपला लोकांनी नाकारले. आम्ही जनतेच्या समस्या सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करू.
- राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष
Web Title: Defeated today and will also in 2019 elections says Congress President Rahul Gandhi