त्रिपक्षीय चर्चा उद्या; संरक्षणमंत्री राजनाथसिंह रशियाला रवाना 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 जून 2020

सरहद्दीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाशी संरक्षण क्षेत्रातील भागीदारी  आणखी वाढविण्याबरोबरच एस-४०० क्षेपणास्त्र  खरेदीचा मुद्दाही या दौऱ्यात मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.  

नवी दिल्ली - दुसऱ्या महायुद्धात रशियाने मिळविलेल्या विजयाच्या हीरक महोत्सव सोहळ्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आज रवाना झाले. सरहद्दीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाशी संरक्षण क्षेत्रातील भागीदारी आणखी वाढविण्याबरोबरच एस-४०० क्षेपणास्त्र खरेदीचा मुद्दाही या दौऱ्यात मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. भारत, रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची त्रिपक्षीय चर्चा उद्या (ता. २४) मॉस्कोमध्ये होणार आहे. 

संरक्षणमंत्री राजनाथसिंह आज रशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यामध्ये भारत आणि रशियादरम्यानच्या संरक्षण; तसेच व्यूहतंत्रात्मक क्षेत्रातील भागीदारी वाढविण्याच्या करारांवर चर्चा होईल, असे राजनाथसिंह यांनी मॉस्कोला रवाना होण्यापूर्वी सांगितले. लडाख सीमेवर भारत आणि चिनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले असून, तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर रशियाकडून सुखोई-३० लढाऊ जेटविमाने, टी-९० रणगाडे, युद्धनौका, पाणबुड्या यासारख्या महत्त्वाच्या संरक्षण साहित्याचे सुटेभाग तातडीने भारताला मिळावेत, विशेष म्हणजे हे सुटेभाग जलमार्गाऐवजी हवाई मार्गाने पोचविले जावे, या मागणीसाठी देखील संरक्षणमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या तीन दिवसांच्या दौऱ्यात राजनाथसिंह यांची रशियन नेतृत्वासोबतही चर्चा होणे अपेक्षित आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अनौपचारिक मध्यस्थी? 
भारत, रशिया आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची त्रिपक्षीय चर्चा उद्या (ता. २४) मॉस्कोमध्ये होणार आहे. ही बैठक पूर्वनियोजित असली, तरी भारत आणि चीनदरम्यान असलेल्या सीमावादामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. यानिमित्ताने भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी समोरासमोर येतील. गलवान खोऱ्यात १५ जूनला झालेल्या भारतीय व चिनी सैन्यातील हिंसक झटापटीनंतर दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली होती. भारत व चीनमधील तणाव कमी करण्यासाठी ही बैठक म्हणजे रशियाची अनौपचारिक मध्यस्थी ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ताबारेषेवर वाद वाढल्यानंतर भारतातर्फे रशियाला ही बाब कळविण्यात आली होती; तर रशियानेही या मुद्द्यावर भारताशी संवाद झाल्याचे सांगितले होते; तसेच भारत व चीनने शांततेने हा प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले होते. चीनच्याही संपर्कात रशिया असल्याचे सांगितले जाते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defence Minister Rajnath Singh on Monday left for a three-day visit to Russia