'काँग्रेस तर देशाचा शत्रू आहे', यात दिल्ली विमानतळाला शंका नाही?

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जुलै 2017

काँग्रेसच्याच काळात तुम्हाला या विमानतळाचं कंत्राट मिळालं होतं हे विसरू नका, अशी आठवण एका नेटिझनने करून दिली.

नवी दिल्ली : 'काँग्रेस हा भाजपचा नव्हे तर भारताचा शत्रू असल्याचं' एक ट्विट करण्यात आलं होतं. दिल्ली विमानतळाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ‘यात काही शंकाच नाही’ अशी प्रतिक्रिया या ट्विटवर देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नंतर ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात आली. 

काँग्रेस हा देशाचा शत्रू आहे अशा आशयाचं ट्विट करत शेफाली वैद्य यांनी ट्विटरवरून काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. त्यावर दिल्ली विमानतळाने वरीलप्रमाणे समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. अशा प्रतिक्रियेनंतर ट्विटरवरून लोकांनी विमानतळ प्रशासनावर टीकेची झोड उठवली. काँग्रेसच्याच काळात तुम्हाला या विमानतळाचं कंत्राट मिळालं होतं हे विसरू नका, अशी आठवण एका नेटिझनने करून दिली.

अनधिकृत काम आता अधिकृतपणे!
दिल्ली विमानतळ प्रशासन आणि त्यांचे काही कर्मचारी अशी अनधिकृत कामं आता अधिकृतरीत्या करायला लागले आहेत की काय असा सवाल अनेक नागरिकांनी ट्विटरवरून उपस्थित केला आहे. भाजपच्या वतीने काँग्रेसची खिल्ली उडवण्याची प्रचार मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये दिल्ली विमानतळ देखील अधिकृतपणे सामील झाले आहे, अशी टीका अनेकांनी केली.

चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर आमचे ट्विटर अकाऊंटच हॅक करण्यात आलं होतं, आणि झाल्या प्रकाराबद्दल ते माफी मागत आहेत, दिल्ली विमानतळाच्या या ट्विटर हँडलवरून सांगण्यात आले. 
 

Web Title: delhi airport tweet against congress bjp