बनावट पासपोर्ट प्रकरणी छोटा राजन दोषी

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

छोटा राजन हा 55 वर्षांचा असून, तो 27 वर्षे भारताबाहेर होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा तो सहकारी होता. छोटा राजनवर भारतात 70 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये खून, खंडणी व अंमली पदार्थांचा व्यापार अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. 

नवी दिल्ली - बनावट पासपोर्ट प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन याला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने आज (सोमवार) दोषी ठरविले.

सीबीआयच्या विशेष न्यायालयातील न्यायाधीश वीरेंद्र कुमार गोयल यांनी राजन याच्यासह अन्य तिघांना दोषी ठरविले आहे. या सर्व दोषींना मंगळवारी शिक्षा सुनाविण्यात येणार आहे. तीन सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने मोहन कुमार या नावाने बनावट पासपोर्ट बनविल्याचा आरोप छोटा राजनवर होता. आज त्याला या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले.

छोटा राजन हा सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहे. तर, दोषी ठरविण्यात आलेले अन्य तिघेजण जामीनावर बाहेर आहेत. या सर्वांवर फसवणूक, बनावट कागदपत्रे सादर करणे यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जयश्री दत्तात्रय रहाते, दीपक नटवरलाल आणि ललिथा लक्षमनन ही दोषी ठरविण्यात आलेल्या अन्य तिघांची नावे आहेत.

छोटा राजन हा 55 वर्षांचा असून, तो 27 वर्षे भारताबाहेर होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा तो सहकारी होता. छोटा राजनवर भारतात 70 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये खून, खंडणी व अंमली पदार्थांचा व्यापार अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. 

Web Title: Delhi court convicts gangster Chhota Rajan, 3 others in fake passport case