Crime News : गणपतीचा प्रसाद खाल्ल्याने घडला 'मॉब लिचिंग'चा प्रकार?, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News : गणपतीचा प्रसाद खाल्ल्याने घडला 'मॉब लिचिंग'चा प्रकार?, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Crime News : गणपतीचा प्रसाद खाल्ल्याने घडला 'मॉब लिचिंग'चा प्रकार?, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

नवी दिल्लीः गुन्हेगारीच्या घटनांनी दिल्ली नेहमीच चर्चेत असते. आता एका मुस्लिम तरुणाचा मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे. गणपतीसमोरील प्रसाद खाल्ल्यामुळे त्याला मारहाण झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

ईशान्य दिल्लीमध्ये ही घटना घडली असून २६ वर्षीय इसार अहमद याच्यावर चोरीचा संशय घेण्यात आला होता. त्याला खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या घटनेमागे कुठलंही धार्मिक कारण नसल्याचं म्हटलं आहे. ही घटना मंगळवारी घडली असून मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेत अहमदला त्याचा शेजारी आमिरने रिक्षामधून घरी आणले होते.

'द प्रिंट'ने दिलेल्या वृत्तानुसार अहमदचे वडील अब्दुल वाजिद यांनी सांगितलं की, मी संध्याकाळी घरी आल्यानंर अहमद वेदनेमुळे विव्हळत पडलेला होता. त्याच्या शरीरामधून रक्तस्त्राव होत होता. गणपतीच्या मूर्तीसमोर ठेवलेला प्रसाद खाल्ल्यामुळे जमावाने मारल्याचं त्याने सांगितलं, असं वडिलांनी स्पष्ट केलं.

त्यानंतर सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अमहद याचा मृत्यू झाला. अहमद हा घरामध्ये एकुलता एक मुलगा होता. त्याला चार बहिणी आणि वृद्ध आई-वडील आहेत.

पोलिस उपायुक्त जॉय तिर्की म्हणाले की, इसारने त्याच्या वडिलांना सांगितलं होतं की, काही तरुणांनी त्याला मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सुंदर नगर भागातील G4 ब्लॉकजवळ पकडले. त्याच्यावर चोरीला आळ घेऊन त्याला खांबाला बांधून मारले.

या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. अहमदचे वडील फळविक्रेते आहेत. त्यांना अहमदने गणपतीसमोरील प्रसाद खाल्ल्याने मारहाण झाल्याचं सांगितलं. दुसरीकडे पहाटे घटना घडली आणि चोरीच्या संशयाने अहमदला मारहाण झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनेला कुठलीही धार्मिक बाजू नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :crimedelhi